गडचिरोली : येथील वसुंधरा महिला बांबू शिल्पग्रामला माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी भेट दिली. या भेटीत त्यांनी महिला शिल्पकारांच्या कामाचे कौतुक करत त्यांचा उत्साह वाढविला. बांबूपासून घरगुती शोभीवंत वस्तू बनविणाऱ्या कुटिर उद्योग व लघु उद्योगांना शासनाने निस्तार हक्काने बांबू उपलब्ध करून द्यावा, यासाठी शासनाकडे मागणी करण्यात येईल, असे डॉ.उसेंडी यांनी सांगितले.
या भेटीत डॉ.उसेंडी यांनी महिला शिल्पकारांच्या कामाच्या महत्वावर भर दिला आणि त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी बांबूपासून तयार केलेल्या वस्तू, जसे की फर्निचर, डेकोरेटिव्ह साहित्य आणि घरगुती उपयोगाच्या वस्तू यांना चालना देण्याचा सल्ला त्यांनी दिला.
डॉ.उसेंडी यांनी महिला शिल्पकारांना नेहमी वापरात येणाऱ्या वस्तू तयार करण्यास सांगितले. बांबूपासून बनवलेल्या वस्तूंना चालना मिळावी, यासाठी जागरूकता अभियान चालवावे आणि लोकांना बांबू उत्पादने वापरण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे त्यांनी सांगितले.
































