अपघातग्रस्त मायलेकांच्या मदतीला धावले माजी आमदार कृष्णा गजबे

स्वत:च्या वाहनाने नेले रुग्णालयात

आरमोरी : दुचाकीने जात असलेल्या तरुणाचे वाहन रस्त्यात स्लिप झाल्याने आईसह मुलगा घसरून पडले. यात मुलाला बराच मुक्का मार लागला होता. याचवेळी आरमोरीवरून देसाईगंजकडे जात असलेल्या माजी आ.कृष्णा गजबे यांना हे अपघाताचे दृष्य दिसल्यानंतर ते मदतीसाठी धावले. या अपघाताची माहिती आरमोरी पोलिसांना दिली. पण रुग्णवाहिका येण्यास वेळ लागणार असल्याचे दिसताच त्यांनी आपल्या वाहनात त्या मायलेकांना बसवून देसाईगंजच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

हा अपघात दि.21 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास आरमोरीजवळच्या कोसा विकास केंद्राजवळ घडला. जखमींना गाडीत बसविण्यासाठी गजबे यांचे अंगरक्षक स्वप्निल कारकुरवार आणि चालक किशोर, तसेच जयंत गोंदोले आणि जमलेल्या इतर नागरिकांनी मदत केली.

जखमी युवकाचे नाव सचिन देवगले असे असून ते मायलेक सावंगी येथील रहिवासी आहेत.