गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या वडसा-गडचिरोली या रेल्वेमार्गाच्या कामाला गती मिळण्यासह, जिल्ह्यातील प्रस्तावित इतर रेल्वेमार्गांचे काम मार्गी लागण्यासाठी माजी खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (एसटी मोर्चा) डॅा.अशोक नेते यांनी दिल्लीत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. नक्षलवादाच्या समस्येमुळे तसेच अपुऱ्या दळणवळण सुविधांमुळे या जिल्ह्याच्या विकासाला अनेक मर्यादा आहेत. आता परिस्थिती हळूहळू बदलत असल्याने विकासाच्या प्रकल्पांना अधिक गती देण्याविषयी त्यांनी रेल्वेमंत्र्यांना निवेदन देऊन चर्चा केली.
या भेटीत मा.खा.डॉ.नेते यांनी गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक रचना, सामाजिक परिस्थिती तसेच आर्थिक वास्तव मांडत, रेल्वे जोडणीअभावी जिल्ह्याच्या विकासात येणाऱ्या अडथळ्यांकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. रेल्वे सुविधा उपलब्ध झाल्यास आदिवासी, ग्रामीण व दुर्गम भाग मुख्य प्रवाहाशी जोडले जातील आणि जिल्ह्याचा विकास वेगाने होईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वडसा-गडचिरोलीसह दोन नवीन मार्ग
केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात गडचिरोली– चामोर्शी– आष्टी– आलापल्ली– आदिलाबाद या दक्षिण भारताला जोडणाऱ्या प्रस्तावित रेल्वेमार्गासोबत, गडचिरोली– धानोरा– भानूप्रतापपूर (छत्तीसगड) अशा दोन नवीन रेल्वेमार्गाचे काम आणि गडचिरोली– वडसा (देसाईगंज) या रेल्वेलाईनच्या कामाला गती देण्याची मागणी करण्यात आली. या रेल्वे मार्गांमुळे उद्योग, व्यापार, शेती, खनिज वाहतूक, शिक्षण व आरोग्य सेवा क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असे डॉ.नेते यांनी स्पष्ट केले.
विशेषतः गडचिरोली– वडसा (देसाईगंज) या रेल्वे मार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. हा मार्ग तातडीने आणि जलद गतीने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. हा मार्ग पूर्ण झाल्यास गडचिरोली जिल्ह्यातील इतर प्रस्तावित रेल्वे मार्गांसाठीही तो अत्यंत सोयीचा व महत्त्वाचा ठरेल, असे त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले.
आंतरराज्यीय प्रकल्पांसाठी हवा समन्वय
प्रत्येक प्रकल्पासाठी स्पष्ट कालमर्यादा ठरवून नियमित उच्चस्तरीय आढावा घेण्याची मागणी नेते यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली. आंतरराज्यीय रेल्वे मार्गांसाठी संबंधित राज्यांमध्ये प्रभावी समन्वय वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. रेल्वे प्रकल्प साकार झाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्याचा केवळ दळणवळणाच्या दृष्टीनेच नव्हे, तर सामाजिक व आर्थिक पातळीवरही सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास मा.खा.डॉ.अशोक नेते यांनी व्यक्त केला. विद्यार्थी, रुग्ण, कामगार व व्यापाऱ्यांना सध्या सहन करावा लागणारा त्रास, आर्थिक भु्र्दंड आणि खर्च होणारा वेळ वाचेल आणि जिल्ह्याला विकासाची नवी दिशा मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
































