18 वर्षानंतर डी.एड्च्या विद्यार्थ्यांचे भामरागड येथे उद्या स्नेहमिलन होणार

स्व.राजीव गांधी विद्यालयात आयोजन

भामरागड : येथील स्वर्गीय राजीव गांधी अध्यापक विद्यालयात सन 2004 ते 2007 यादरम्यान डी.एड्.च्या अभ्यासक्रमाला शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन तथा गुरुजन कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन भामरागड येथे 23 व 24 मे 2024 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. तब्बल 18 वर्षानंतर सर्वजण एकत्र येणार असल्यामुळे सर्वांना या कार्यक्रमाची उत्सुकता लागली आहे.

डी.एड्. अभ्यासक्रम ऐन भरात असताना व या अभ्यासक्रमाला विशेष महत्व असताना मराठवाडा आणि विदर्भाच्या अनेक भागातील विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी भामरागडमध्ये प्रवेशित होते. यापैकी बहुतेक विद्यार्थी विविध विभागात शासकीय सेवेत कार्यरत आहेत. भामरागड येथील अध्यापक विद्यालयात शिकून वेगवेगळ्या क्षेत्रात यश संपादन केल्यानंतर गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास ५० पेक्षा अधिक माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती राहणार आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती झेड.एम.शेख यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाकरिता विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक डॅा.प्रकाश आमटे, लोकबिरादरी शासकीय आश्रमशाळेच्या संचालिका समीक्षा अनिकेत आमटे, संवर्ग विकास अधिकारी एस.एस.मगदुम, सहायक प्रकल्प अधिकारी आर.ए. चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी ए.एच. भिसे, नायब तहसीलदा पी.आर.पुप्पालवार, माजी प्राचार्य एम.एम.शेख, मुख्याध्यापक एस.एम.सय्यद यांची उपस्थिती राहणार आहे.

यावेळी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांची मनोगते, मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. या स्नेहमिलन तथा गुरुजन कृतज्ञता सोहळ्याला बहुतांश माजी विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कार्यक्रम संयोजक विनोद कोकणे, प्रदीप भस्के, नवनाथ येडे, सदाशिव नरताम, चंदू मारगोनवार, नितेश कुमरे, आशा तुराणकर, लिना शास्त्रकार, शंकर गच्चे आदींनी केले आहे.