तशी वेळ आल्यास मी सुद्धा उपोषणाला बसणार-वडेट्टीवार

कंकडालवार यांचे उपोषण समाप्त

गडचिरोली : अंगणवाडी सेविका भरतीमधील गोंधळ, भ्रष्टाचार प्रकरणी भामरागडच्या बीडीओंवर कारवाई अशा काही मुद्द्यांना घेऊन माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हा परिषदेसमोर सुरू केलेले उपोषण काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोडविले. या मुद्द्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. हे मुद्दे पावसाळी अधिवेशनात उचलण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. तरीही कारवाई झाली नाही तर तुमच्यासोबत मी सुद्धा उपोषणाला बसेन, असा निर्धार यावेळी वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

यावेळी विजय वडेट्टीवार आणि खासदार डॅा.नामदेव किरसान यांच्या हस्ते अजय कंकडालवार यांना ज्युस पाजून त्यांच्या उपोषणाची सांगता करण्यात आली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी उपोषण मंडपात येऊन विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाची बाजू मांडली. यावेळी माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पा.पोरेटी, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर, आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी आणि काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

अहेरी येथे अंगणवाडी सेविका भरती प्रकरणात नववी उत्तीर्ण उमेदवाराने बारावी उत्तीर्ण झाल्याचे बोगस प्रमाणपत्र जोडल्याचे उघडकीस आले असताना जिल्हा परिषदेकडून कारवाई झाली नाही. त्यामुळे कागदपत्रे पडताळणी समितीच्या हेतूवर वडेट्टीवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या समितीवर कायदेशिर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय भामरागडचे गटविकास अधिकारी मदगुम यांनी रोजगार हमीच्या कामांत गैरप्रकार केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले असताना त्यांच्यावर प्रशासकीय कृपादृष्टी ठेवत कारवाई होत नसल्याबद्दलही वडेट्टीवार यांनी ‘चोर-चोर मावस भाऊ, आपण मिळून दाबून खाऊ’ असा प्रकार सुरू असल्याचा आरोप केला.