
गडचिरोली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विदर्भ प्रांताचे 54 वे अधिवेशन दिनांक 9, 10 व 11 जानेवारी रोजी भगवान बिरसा मुंडा नगर (सुमानंद सभागृह), आरमोरी रोड गडचिरोली येथे होत आहे. त्यानिमित्त विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये अभाविपच्या कार्याची माहिती, जनजातीय वीरांची यशोगाथा आणि गडचिरोलीच्या आदिवासीबहुल संस्कृतीची झलक दाखविणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरूवारी संध्याकाळी करण्यात आले.
अनेक वर्ष अभाविपमध्ये काम करणाऱ्या स्व.गीताताई हिंगे यांच्या नावाने असलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या शितल सोमनानी यांच्या हस्ते गीताताई यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी माजी आमदार डॅा.देवराव होळी, नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष सुशील हिंगे यांच्यासह अभाविपचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सर्व अतिथींनी प्रदर्शनाचे अवलोकन केले. त्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधींसमोर मार्गदर्शन करताना अभाविपच्या कार्याची प्रशंसा करत तीन दिवसीय अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या. यावेळी सुशिल हिंगे यांनी स्व.गीता हिंगे यांच्या आठवणींना उजाळा देत अभाविपने त्यांच्यावर कसे चांगले संस्कार घडविले याची माहिती दिली.
आज 11.45 वाजता या विदर्भ प्रांत अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्या हस्ते होणार आहे. मुख्य अतिथी म्हणून विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, तर अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.विरेंद्रसिंह सोलंकी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
































