गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरीच्या वतीने आज, दि.26 जुलै रोजी अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा अहेरी येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरीकांनी या महोत्सवाला भेट देऊन खरेदीद्वारे या उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग घ्यावा, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कुशल जैन यांनी केले आहे.
पावसाळ्यात आदिवासी पट्ट्यात नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणाऱ्या रानभाज्या, रानफळे, वनौषधे, अन्नधान्य यांचे संकलन करून त्यांना शहरी बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या पोषणमूल्यांबाबत जनजागृती करणे, तसेच आदिवासी उत्पादकांच्या ‘शबरी नॅचरल्स’ या प्रीमियम ब्रॅण्डला प्रोत्साहन देणे, या उपक्रमातून आदिवासी समाजाला स्वतःच्या पारंपरिक ज्ञानावर आधारित शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या महोत्सवामागील मुख्य उद्देश आहे.
महोत्सवात प्रकल्प क्षेत्रातील नोंदणीकृत आदिवासी महिला बचतगट, सामाजिक संस्था व स्थानिक उत्पादक यांचा सक्रिय सहभाग राहणार असून त्यांनी रानभाज्या, वनऔषधी आणि पारंपरिक खाद्यपदार्थांचे सादरीकरण केले आहे.
शहरातील नागरीकांना रानभाज्यांची प्रत्यक्ष ओळख, त्यांचे औषधी गुणधर्म, रेसिपीज आणि उपयोग यांची माहिती मिळावी यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय खरेदीसाठी विक्री स्टॉल्सही लावण्यात येणार आहेत.