गडचिरोली : रानभाज्या ही निसर्गाची देण आहे. त्या अतिशय गुणकारी आहेत. त्या खाल्ल्याने आरोग्यविषयक काही समस्या दूर होतात. रोगप्रतिकारशक्ती वाढते. रानभाज्यांचे सेवन आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे रानभाज्या खा आणि पोषक तत्वे मिळवा, असे मार्गदर्शन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी रणजित यादव यांनी केले. (अधिक बातमी खाली वाचा)
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत शासकीय इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेत रविवारी (दि.20) रानभाज्या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते उद्घाटक तथा अध्यक्ष म्हणून बोलत होते. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला व रानभाज्यांविषयी विद्यार्थ्यांकडून माहिती जाणून घेतली. रानभाज्यांचे महत्त्व, ओळख याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कर्मचारी व विद्यार्थ्यांना निर्व्यसनी राहण्याचा सल्ला यावेळी त्यांनी दिला.
कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ.प्रभू सादमवार, तर प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा उर्मिला सिडाम, चंद्रशेखर सिडाम, अनिल सुरपाम, भाऊराव नन्नावरे, अनिता पुंगाटी, मुख्याध्यापिका वंदना महल्ले उपस्थित होते.
या रानभाज्या खा, आरोग्य सुधारा
पावसाळा सुरू झाला की अनेक रानभाज्या उगवतात. त्यात प्रामुख्याने मशरूम, कोयार, शिरडिरे, धानभाजी, पातूर, कडूभाजी, कानभाजी, केना, अरतफरी, हरतफरी, रानधोपा, कुड्याच्या शेंगा, कुकूर्डा, आंबाडी, काटवल, खापरखुटी, तरोटा, लालमाट, शेवगा भाजी, मोठा चिचवा, लहान चिचवा आदी भाज्यांची प्रदर्शनी भरविण्यात आली होती. या भाज्या तसेच भारंग, टाकळा, कपाळफोडी, कर्तुली, आघाडा, चुका, कळधी, शेपू, शेवळा आदी रानभाज्यांमध्ये अनेक पोषक तत्वे आहेत. काही रानभाज्या विशिष्ट आजारांसाठी औषध म्हणूनही वापरल्या जातात.
पावसाळ्यामध्ये दोन ते तीन महिनेच रानभाज्या मिळत असल्याने रानभाज्या आवर्जून खायला पाहिजे. त्यांच्यामध्ये अनेक जीवनसत्वे, खनिजे, कॅल्शियम, भरपूर प्रमाणात लोह, अँटीऑक्सिडंट्स, फायबर असते. पचनक्रिया सुधारते व बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. निसर्गात मिळणाऱ्या रानभाज्यात रासायनिक खते व कीटकनाशके वापरली जात नसल्याने त्या रानभाज्यांचे सेवन अतिशय सुरक्षित व शक्तिवर्धक असल्याची जाणीव यावेळी उपस्थितांना करून देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी गुलाब डोंगरवार, डाकराम धोंगडे, निलेश कळंब, अतुल बलगुजर, शारदा कोटांगले, अधीक्षक देविदास चोपडे, अधीक्षिका निमा राठोड, जे.डी. टेकाम , साईनाथ सिडाम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.