कमलापूर हत्ती कॅम्पला येणार सुगीचे दिवस, पर्यटकांना सुविधा

आ.धर्मरावबाबा आत्राम यांची ग्वाही

अहेरी : राज्यातील एकमेव शासकीय हत्तीकॅम्प असलेले कमलापूर पर्यटकांसाठी मोठे आकर्षण आहे. दररोज या ठिकाणी विविध राज्यातील पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. मात्र त्या ठिकाणी पर्यटकांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा नाहीत. त्यामुळे या परिसरात विकास कामे करून शासकीय हत्तीकॅम्पचा कायापालट करणार, अशी ग्वाही माजी मंत्री तथा अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली.

आ.आत्राम यांनी कमलापूरला भेट देऊन आपल्या हातांनी हत्तींना केळी चारल्या. यावेळी त्यांनी सुरुवातीला प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत नैनगुडम ते तोंडेर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले. हा परिसर अत्यंत घनदाट जंगलाने व्यापला असून या परिसरात पक्का रस्ताच नव्हता. नैनगुंडम ते तोंडेर दरम्यान विविध गावांतील नागरिकांना जवळपास 5 ते 6 किलोमीटर अत्यंत खडतर प्रवास करावा लागत होता. पावसाळ्यात गर्भवती महिला, इतर रुग्णांना बांबूच्या झोळीत घेऊन यावे लागत होते. आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी पाठपुरावा करून या ठिकाणी रस्त्याचे काम मंजूर करून केले. तब्बल 5 कोटी रुपयांच्या निधीतून हे रस्त्याचे काम केले जाणार आहे.

त्यानंतर शासकीय हत्ती कॅम्प परिसरात त्यांनी जवळपास एक कोटी रुपयांच्या निधीतून केल्या जाणाऱ्या विकासात्मक कामांचे भूमिपूजन केले. यात पगोड्याचे बांधकाम, पार्किंग शेडचे बांधकाम, मेन गेट ते तलावापर्यंत अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम, रेपनपल्ली ते कमलापूर हत्ती कॅम्पपर्यंत जाणाऱ्या मार्गावर स्वागत कमानींसह इतर बांधकाम केले जाणार आहे.

यावेळी त्यांनी सिरोंचाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्याशी संवाद साधत त्या ठिकाणी परिस्थितीची माहिती घेतली. सोयीसुविधांबाबत विचारपूस करून आवश्यक त्या कामांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक विष्णुवर्धन रेड्डी, कमलापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी जी.जी.गडमडे, माजी जि प अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, सरपंच रजनिता मडावी, सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार, राकॉचे कार्यकारी अध्यक्ष रियाज शेख, बानय्या जनगाम, संतोष ताटीकोंडावार, महेश गुंडेटीवार, कमलापूर ग्रामपंचायतचे सदस्य तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पर्यटनाला नवी चालना मिळणार

आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी शासकीय हत्ती कॅम्प, कमलापूर येथे भेट देऊन सविस्तर पाहणी केली. कॅम्पमधील हत्तींची राहणीमानाची परिस्थिती, त्यांच्यासाठी उपलब्ध सुविधा आणि व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला. पाहणीदरम्यान धर्मरावबाबांनी स्वतः हत्तींना केळी खाऊ घातली आणि त्यांच्याशी ममत्वपूर्ण सान्निध्य साधत आनंदाचे क्षण अनुभवले. उपस्थित पर्यटकांसोबत गप्पा मारत त्यांनी वन्यजीव संवर्धन, पर्यटन विकास आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी या महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा केली. हत्ती कॅम्पच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटनाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.