शेतजमिनीच्या वादातून आत्याचा जीव घेणाऱ्या भाच्याला सात वर्षाची सक्तमजुरी

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश उदय शुक्ल यांचा निर्णय

गडचिरोली : शेतजमिनीच्या हिस्स्याच्या वादात आपल्या आत्याच्या डोक्यावर लाकडी पाटीने मारून तिला जीवानिशी ठार मारण्याचा प्रकार कुरखेडा तालुक्यातील कोटलडोह येथे १८ जुलै २०२१ रोजी घडला होता. याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी भाच्याला न्यायालयाने सात वर्षाची सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. आसाराम बिजाराम कुमरे (३५ वर्ष) असे आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, कोरची तालुक्यातील मोहगाव येथील रहिवासी असलेली तुळजाबाई मंगू कल्लो (६० वर्ष) ही महिला आपली मुलगी अनुसया वासुदेव कुमरे हिच्याकडे भेटण्यासाठी आली होती. आठवडाभर तिच्याकडे थांबल्यानंतर ती त्याच गावात राहणाऱ्या भाच्याकडे (सुनील कुमरे) गेली. काही वेळात दुसरा भाचा आसाराम बिजाराम कुमरे (३५ वर्ष) याच्याशी तिचा शेतजमिनीच्या हिस्स्यावरून वाद झाला. यातच आसाराम याने एका पाटीने तुळजाबाई हिच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. यामुळे तुळजाबाई बेशुद्ध होऊन तिथेच पडली. जमलेल्या लोकांच्या मदतीने तुळजाबाईच्या मुलीने तिला उपचारासाठी नेले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यावरून आरोपीविरूद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी तपासात सबळ पुरावा गोळा करून दोषारोपपत्र दाखल केले. साक्षीदारांचे बयाण आणि युक्तीवाद ग्राह्य धरत न्या.उदय शुक्ल यांनी आरोपीला शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील एस.यु.कुंभारे यांनी कामकाज पाहिले. प्रकरणाचा तपास पो.उपनिरीक्षक दीपक शेळके यांनी केला.