आरमोरी : तालुक्यात एकाच दिवशी घडलेल्या दोन आकस्मिक मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. एका घटनेत शेतकऱ्याने भविष्याच्या चिंतेने आत्महत्या केली, तर दुसऱ्या घटनेत एका तरुणाचा करंट लागून मृत्यू झाला.

प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील इंजेवारी येथील गजानन नामदेव लाकडे (58 वर्ष) या शेतकऱ्याने झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. लाकडे यांची काही शेती दोन वेळा रेल्वेच्या प्रकल्पात गेली. त्यातील काही पैसे अजूनही त्यांना मिळालेले नाही. याशिवाय उरलेल्या मोजक्या शेतातील धानाचे पिक नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे वाया गेले. यामुळे लाकडे हे चिंतेत होते, असे त्यांच्या मुलाने सांगितले. दुपारी 12 वाजता मृतदेह शवविच्छेदनासाठी आणला, पण शवविच्छेदन संध्याकाळी करण्यात आल्याने नातेवाईकांनी रोष व्यक्त केला.
दुसऱ्या घटनेत पळसगाव येथील निखिल पुरुषोत्तम नारनवरे या युवकाचा घरात करंट लागुन मृत्यू झाला. दुपारी 3 वाजता तो बाहेरून घरी आला. हात-पाय धुवून तो लाईटचे बटन दाबायला गेला, पण ओल्या हातामुळे बोर्डमधून करंट येऊन त्याला जोरदार झटका बसला. यातच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. त्याच्या कुटुंबात दोघे भाऊ व आई-वडील होते. निखिल हा लहान भाऊ होता.
































