Home दैनंदिन बातम्या शेतकऱ्यांच्या मुंडण आंदोलनाने दणाणले जिल्हाधिकारी कार्यालय

शेतकऱ्यांच्या मुंडण आंदोलनाने दणाणले जिल्हाधिकारी कार्यालय

जमीन अधिग्रहणाला 14 गावांचा विरोध

गडचिरोली : प्रस्तावित जेएसडब्ल्यूच्या लोहप्रकल्पासाठी सरकारमार्फत केल्या जाणाऱ्या जमीन अधिग्रहणाला चामोर्शी तालुक्यातील 14 गावातील शेतकऱ्यांनी विरोध करत गुरूवारी मुंडण आंदोलन केले. शेतकऱ्यांनी दाखवलेल्या या अभुतपूर्व एकजुटीने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमीन घेणार नाही, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आले, मात्र जमीन अधिग्रहणासंदर्भातील अधिसूचना रद्द करत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

चामोर्शी औद्योगिक क्षेत्र टप्पा 7 मध्ये भेंडाळा परिसरातील ज्या 14 गावांमधील शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहणाची अधिसूचना काढण्यात आली त्या गावकऱ्यांनी मुंडण करत मनोज पोरटे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. भेंडाळा, घारगाव, रामाळा, फोकुर्डी, वाघोली आणि इतर गावांमधील हजारो शेतकऱ्यांनी भर उन्हात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून जोरदार नारेबाजी सुरू केली. ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. हरणघाटच्या मुरलीधर महाराजांसह या आंदोलनाला पाठिंबा देणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी स्वत: मुंडण करून शासनाच्या अधिसूचनेचा अनोख्या पद्धतीने निषेध केला. प्रकल्प रद्द होईपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे महेंद्र ब्राह्मणवाडे म्हणाले. तर जमीन अधिग्रहण प्रक्रिया रद्द न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबियांसह ठाण मांडणार असल्याचे आंदोलन शेतकरी म्हणाले.

या आंदोलनाला माजी आमदार डॅा.नामदेव उसेंडी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा.रमेश बारसागडे, शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अमोल गण्यारपवार आदींनी भेट देऊन सहभाग घेतला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.