अतिदुर्गम भागातील 45 शेतकरी निघाले 10 दिवसांच्या कृषीदर्शन सहलीला

पोलीस आणि प्रकल्प कार्यालयाचा उपक्रम

गडचिरोली : गडचिरोली पोलिसांच्या दादालोरा खिडकी व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय भामरागड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोजेक्ट उडान अंतर्गत एटापल्ली, भामरागड व हेडरी पोलीस उपविभागातील अतिदुर्गम गावांमधील शेतकऱ्यांना बाहेरची दुनिया दाखवली जाणार आहे. त्यासाठी त्यांची कृषीदर्शन व अभ्यास दौरा सहल रवाना करण्यात आली. 10 दिवस हे शेतकरी अमरावती, अकोला, जळगाव, पुणे, परभणी, यवतमाळ अशा विविध जिल्ह्यांना भेटी देणार आहेत.

पारंपरिक शेतीला बगल देत विविध क्लृप्त्यांचा वापर करीत आधुनिक शेती करणाऱ्या शेतक­ऱ्यांच्या बांधावर जाऊन तेथील परिस्थितीची, आधुनिक शेती व उपकरणांची हे शेतकरी पाहणी करतील. त्या ज्ञानाचा वापर करून पारंपरिक शेती पध्दतीत बदल करतील. त्यासाठी जिल्ह्रातील शेतक­ऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी या उद्देशाने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून गडचिरोली येथून एकुण 45 शेतक­ऱ्यांना एका विशेष बसगाडीने कृषीदर्शन व अभ्यास दौऱ्यासाठी रवाना करण्यात आले.

आतापर्यंत पोलिसांच्या पुढाकाराने 15 कृषी दर्शन सहल व अभ्यास दौरे काढण्यात आले. त्यात दुर्गम भागातील विविध उपविभागातून 693 महिला व पुरुष शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. या सोळाव्या कृषीदर्शन सहलीला अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख उपस्थित होते. सहलीच्या नियोजनासाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, संबंधित पो.स्टे.चे प्रभारी अधिकारी, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि.धनंजय पाटील, पोउपनि. शेळके, पोउपनि.अतुल सोनोने व अंमलदारांनी सहकार्य केले.