कोरची : सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. यात खाद्यतेल, दूध, खोव्यासह अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करून ते पदार्थ ग्राहकांच्या माथी मारले जातात. पण यावर्षी भेसळखोरांचे मनसुबे धुळीस मिळण्याची शक्यता आहे. अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी अन्न प्रशासन विभागाला जागरूक करत भेसळखोरांना रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात तपासणी करून भेसळयुक्त वाटणाऱ्या मालाची जप्ती सुरू केल्याची माहिती ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली. कोरची येथे बुधवारी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर टोकावरील कोरची येथे ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी तहसील कार्यालयातील सभागृहात विविध शासकीय कामांचा आढावा घेतला. यावेळी आरमोरी क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार हरीराम वरखडे (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवी वासेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, माजी कृषी सभापती नाना नाकाडे, तहसीलदार प्रशांत गड्डम, गटविकास अधिकारी राजेश फाये, पोलीस निरीक्षक अमोल फडतरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीत अन्न, औषधी, आरोग्य सेवा, रस्ते, शिक्षण या विभागातील अधिकाऱ्यांच्या कामांचा लेखाजोखा बघून अधिक उत्तम काम करण्यासाठी त्यांनी निर्देश दिले. या तालुक्यात कमी कर्मचारी असताना सुद्धा कामकाज सुरळीत सुरू असल्याबद्दल त्यांनी कौतुक करत मुख्यमंत्र्यांशी बोलून रिक्त पदे भरली जातील असे सांगितले. सदर आढावा बैठकीला अनुपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी तहसीलदार प्रशांत गड्डम यांना दिले.
तहसील कार्यालयातील आढावा बैठकीनंतर कोरची तालुक्यातील कोहका व बोरी येथील एबीस कंपनीच्या तपासणीसाठी धर्मरावबाबा आत्राम यांचा ताफा निघाला होता, आधी कोहका येथे एबीस कंपनीजवळ त्यांचा ताफा गेला. पण मुख्य कार्यालय बोरीच्या एबीस कंपनीत असल्याने ताफा त्या दिशेने निघाला. मात्र वेळ झाल्याने त्यांचा ताफा कुरखेडाच्या दिशेने निघाला.