एफडीसीएमच्या कर्मचाऱ्यांना मिळणार नवीन निवासस्थान, ३.२५ कोटींचा खर्च

ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन

आलापल्ली : फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेडच्या प्राणहिता वन प्रकल्प विभाग आलापल्ली येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवासाची सोय होणार आहे. ३ कोटी २५ लाखांच्या निधीतून १२ निवासस्थानांच्या तीन मजली इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री, तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करून सुरूवात करण्यात आली.

राज्यात शासनाचे अनेक महामंडळ कार्यरत आहेत. त्यापैकी आर्थिक सक्षम असलेल्या महामंडळांपैकी वनविकास महामंडळ हे एक आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागातील आलापल्ली येथे प्राणहिता वन प्रकल्प विभाग, मार्कंडा वन प्रकल्प विभाग तसेच या अंतर्गत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एकाच परिसरात निवासाची सोय आहे. अनेक वर्षांपूर्वीची इमारती असल्याने याठिकाणी वास्तव्याने राहणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यातील अनेक इमारती मोडकळीस आल्या आहेत. एवढेच नाही तर पावसाळ्यात दरवर्षी येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे या ठिकाणी नुतन निवासस्थानांची गरज होती.

येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची अडचण लक्षात घेऊन या परिस्थितीवर कायमचा तोडगा काढण्यासाठी प्राणहिता वन प्रकल्प विभाग, आलापल्लीचे विभागीय व्यवस्थापक डी.एस. चांदेकर यांनी पाठपुरावा करत निधीची मागणी केली होती. अखेर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या बांधकामासाठी निधी प्राप्त झाला आहे. यात इमारतीच्या बांधकामासोबत विद्युतीकरण, वाहनतळ, कुंपनाचे बांधकाम केले जाणार आहे.

यावेळी ना.धर्मरावबाबा आत्राम यांचा प्राणहिता वन प्रकल्प विभागाचे विभागीय व्यवस्थापक डी.एस. चांदेकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम, सिरोंचाच्या उपवनसंरक्षक पुनम पाटे, भामरागडचे उपवनसंरक्षक शैलेश मीना, आलापल्लीचे उपवनसंरक्षक राहुलसिंह टोलिया, सहाय्यक व्यवस्थापक चंद्रकांत राजपूत, सहाय्यक व्यवस्थापक अमोल नागे, सरपंच शंकर मेश्राम, उपसरपंच विनोद अक्कनपल्लीवार, आलापल्लीचे ग्रामपंचायत सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वनविकास महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.