शासकीय सेवेत निवड झालेल्यांचा शिवराय सामाजिक संस्थेतर्फे सत्कार

संघर्षातून मार्ग काढत गाठले यश

गडचिरोली : शिवराय सामाजिक संस्था नवेगाव-मुरखडा यांच्या वतीने शासकीय सेवेत निवड झालेल्या त्या परिसरातील युवकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संबंधित युवकांनी आपल्या यशामागील संघर्ष सांगत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे मुख्य सत्कारमूर्ती म्हणून पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेले गणेश किशोर गडपल्लीवार, आरोग्य सेवकपदी निवड झालेले राहुल गंगाधर गेडाम, तसेच स्थापत्य अभियंतापदी निवड झालेले पराग हिराचंद नेवारे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला सत्कारमूर्तींसोबत त्यांच्या पालकांचीही उपस्थिती होती. यावेळी राहुल गेडाम आणि पराग नेवारे यांनी आपल्या प्रवासातील संघर्षाची आठवण करून देत प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी सातत्याने घेतलेल्या मेहनतीनंतरच्या यशाचे कौतुक व्हावे, भविष्यात शासकीय सेवेत जाण्याचा ध्यास घेतलेल्या विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळावी हा या कार्यक्रमामागील हेतू होता. निवड झालेल्या मित्रांकडून उत्कृष्ट सेवा कार्य व्हावे आणि समाजहितासाठी त्यांचे योगदान सतत वाढावे, यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शिवराय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष परमानंद राजू पुन्नमवार यांनी पुढाकार घेतला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मयूर मुनघाटे यांनी केले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, गावकरी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.