अहेरी : धनुर्विद्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत रजत पदक पटकावणाऱ्या मिथुन मडावी याचा माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते सत्कार करून त्याचे कौतुक करण्यात आले. मिथुन मडावी याने पिंपरी चिंचवड (पुणे) या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत रजत पदक मिळवले. त्याची राष्ट्रीय स्तरावर पाटीयाला (पंजाब) येथे होण्याऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
मेहनत, शिस्त आणि सातत्याच्या जोरावर हे यश संपादन करणाऱ्या मिथूनचे अभिनंदन करत अंब्रिशराव आत्राम यांनी मिथुनला पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करावी, यासाठी असे खेळाडू प्रेरणादायी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
मिथुन परशुराम मडावी हा राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय, महागाव येथील बारावीचा विद्यार्थी आहे. त्याच्या यशात शाळेचे प्राचार्य आणि वर्ग शिक्षकांच्या प्रोत्साहन व मार्गदर्शनाचा वाटा आहे. सत्कार स्वीकारताना मिथुन याने आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक, कुटुंबीय व शाळेतील शिक्षकांना दिले.
































