Home दैनंदिन बातम्या नाट्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा येरंडीत सत्कार

नाट्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा येरंडीत सत्कार

कलाकारांचे योगदान महत्वपूर्ण- गजबे

कुरखेडा : अखिल भारतीय गुरुदेव सेवा नाट्य कला मंडळ कढोलीच्या वतीने तथा साईबाबा मंदिर येरंडी, आदर्श गणेशोत्सव मंडळ येरंडी तथा गावकरी मंडळींच्या वतीने श्रीराम नवमीच्या निमित्ताने ‘महाकाल’ या नाटकाचे आयोजन केले होते. यानिमित्ताने नाट्य क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कृष्णा गजबे होते.

नाट्य रंगभूमीच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन आणि मनोरंजन करणाऱ्या कलाकारांचे समाजासाठीचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यांचे कार्य अभिनंदनीय आहे, असे प्रतिपादन यावेळी कृष्णा गजबे यांनी केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जीवन पाटील नाट यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री परशुराम खुणे, भाजपचे तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा प्रमुख किशोर तलमले, माजी पंचायत समिती सभापती प्रभाकर तुलावी, उपसरपंच राम लांजेवार, नाट्य लेखक चुडाराम बल्लारपुरे, आरोग्यधाम संस्थेचे अध्यक्ष डॉ.रमेश कटरे, माजी सभापती गिरधारी तितराम, वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास धोंडने, किशोर हरडे, चंद्रकांत चौके, राकेश चव्हाण, एकनाथ सोनुले असे अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी नाटककार चुडाराम बल्लारपुरे, पद्मश्री डॉ.परशुरामजी खुणे, प्रल्हाद मेश्राम, जराते महाराज, विठ्ठल खानोलकर, विश्वंभर गहाणे, केवल बगमारे, दीनानाथ बाळबुद्धे यांचा शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष दुर्गेश मुंगणकर, उपाध्यक्ष गणेश मडावी, सचिव संतोष मडावी, कोषाध्यक्ष राहुल लोहबरे, छगन मडावी, विश्वंभर गहाणे व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.