पदवीधर मतदार संघासाठी जिल्ह्यात 11493 मतदारांची नोंद

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

गडचिरोली : नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात गडचिरोली जिल्ह्यातून 11 हजार 493 मतदारांच्या नोंदणीसह नागपूर विभागात एकूण 1 लाख 59 हजार 925 मतदारांचा समावेश आहे.

भारत निवडणूक आयोगाने दिनांक 12 सप्टेंबर, 2025 च्या पत्रान्वये दिनांक 1 नोव्हेंबर, 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत नागपूर विभागातील पदवीधर मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करावयाचा पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला होता. दिनांक 14 नोव्हेंबर, 2025 रोजीच्या पत्रान्वये सुधारीत कार्यक्रम घोषित करण्यात आला.

दिनांक 1 नोव्हेंबर, 2025 या अर्हता दिनांकावर आधारित नागपूर विभागातील पदवीधर मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत, 3 डिसेंबर, 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीमध्ये गडचिरोली जिल्ह्यात 10 हजार 875 मतदारांची नोंदणी झाली होती. त्यानंतर 3 डिसेंबर ते 18 डिसेंबर, 2025 पर्यत दावे व हरकती स्विकारण्यात आल्या आणि 5 जानेवारी, 2026 पर्यत दावे व हकरती निकाली काढण्यात आल्या आहेत. सदर कालावधीमध्ये 50 हरकती प्राप्त झाल्या. सर्व हरकती स्विकारण्यात आलेल्या आहेत.

प्राप्त हकरतीमधील 30 दुबार मतदारांची वगळणी करण्यात आली. प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर एकुण 648 मतदारांची नोंदणी करण्यात आली. त्यानुसार अंतिम मतदार यादीमध्ये एकूण 11 हजार 493 मतदारांची नोंदणी झाली असल्याचे निवडणूक विभागामार्फत कळविण्यात आले आहे.