जिल्हा सामान्य रुग्णालयात औषधी खरेदीत अनियमितता?

तत्कालीन अधिकाऱ्यांना अभय

गडचिरोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या काही वर्षात औषधी खरेदीत आर्थिक घोळ झाल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. मात्र यात तत्कालीन जबाबदार अधिकाऱ्यांना अभय देत औषध निर्माण अधिकारी (वर्ग 3) महेश देशमुख यांना निलंबित केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विभागीय आरोग्य उपसंचालक डॅा.शशिकांत शंभरकर यांनी ही कारवाई केली.

जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूरच्या आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य आणि तपासणी समितीच्या अध्यक्षांनी दिलेल्या चौकशी अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली. यात देशमुख यांच्यावर वित्तीय अनियमिततेचा ठपका ठेवत शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयाचे तत्कालीन जबाबदार अधिकारी यांना अभय देत केवळ कनिष्ठावर कारवाई का, अशी चर्चा आरोग्य विभागात सुरू आहे.

वास्तविक औषधी खरेदी किंवा इतरही व्यवहार हे रुग्णालयाचे प्रशासकीय कामकाज पाहणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने होतात. मग त्यांना सोडून कनिष्ठ अधिकाऱ्याला यात अडकविण्यामागे नेमका हेतू काय, अशी चर्चा सुरू आहे.