गडचिरोली : सिरोंचा उपविभागातील अवैध गौण खनिज प्रकरणात जिल्हा प्रशासनाने तपासणीची कारवाई करत 15 हजार 665 ब्रास अवैध रेतीसाठा व वाहने जप्त केली आहेत. याप्रकरणी 29 कोटी 36 लाख 56 हजारांचा दंड प्रस्तावित करण्यात आला आहे.

सिरोंचा विभागात अवैध रेती तस्करीबाबत सातत्याने प्राप्त तक्रारीवरून जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा अहेरीचे उपविभागीय अधिकारी कुशल जैन यांना विशेष तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या पथकाने 2 ऑक्टोबर रोजी अंकिसा माल, चिंतरेवला व मद्दीकुंठा येथे तपासणीची कारवाई केली. यावेळी अंकिसा माल येथे सर्व्हे नंबर 908 मधील रेतीसाठ्यात 64 ब्रास आणि सर्व्हे नंबर 690 व 691 मधील साठ्यात 59 ब्रास रेतीची तफावत (कमी साठा) आढळली आहे. या दोन्ही प्रकरणात चौकशी करण्यात येत आहे. याशिवाय मद्दीकुंठा येथील सर्व्हे नंबर 533 मध्ये परवानगी असलेल्या ठिकाणी भेट दिली असता, रेतीसाठा दुसऱ्याच जागेवर म्हणजेच सर्व्हे नंबर 356 मध्ये असल्याचे आढळले.

मोजमाप अहवालानुसार, या ठिकाणी एकूण 15 हजार 665 ब्रास रेतीसाठा दिसून आला. साठवणूक आणि वाहतुकीसाठी संबंधितांकडे कोणताही वैध परवाना उपलब्ध नसल्यामुळे, हा साठा अवैध घोषित करून जप्त करण्यात आला. याशिवाय, गौण खनिज उत्खनन व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या 2 जेसीबी मशीन, 1 पोकलँड मशीन आणि 5 ट्रक ही वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत.

तहसीलदार सिरोंचा यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48(7) व 48(8) मधील तरतुदीनुसार पुढील कार्यवाहीसाठी उपविभागीय अधिकारी, अहेरी यांच्याकडे अहवाल सादर केला आहे. त्यात जप्त केलेल्या 15,665 ब्रास अवैध साठ्यासाठी प्रतिब्रास ₹ 18,600 दंड (पेनल्टी) प्रमाणे एकूण अंदाजित रक्कम 29 कोटी 36 लाख 56 हजार 800 रुपये दंड प्रस्तावित करण्यात आला आहे.

अंतिम सुनावणी आणि अपीलाच्या अधीन राहून ही दंडाची रक्कम निश्चित होईल. या सर्व प्रकरणात चौकशी सुरू असल्याचे सहायक जिल्हाधिकारी कुशल जैन यांनी कळविले आहे.












