सुरजागड खाण परिसरातील लॉयड्स काली अम्मल हॉस्पिटलची वर्षपूर्ती

24 तास मिळत आहे निःशुल्क सेवा

एटापल्ली : तालुक्यातील सुरजागड खाण परिसरातील हेडरी येथे लॅायड्स मेटल्स कंपनीकडून उभारण्यात आलेल्या काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलच्या उभारणीला एक वर्ष झाल्यानिमित्त पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 30 खाटांच्या या रुग्णालयात विविध तज्ज्ञ डॅाक्टरांची सेवा नि:शुल्क आणि 24 तास मिळत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढली आहे. वर्षभरात 61 हजारांवर रुग्णांनी या दवाखान्यातील वैद्यकीय सेवेचा लाभ घेतल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली.

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीसारख्या अतिदुर्गम भागातील नागरिकांचा वैद्यकीय सेवा मिळताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे बहुतांश लोक गावातच पुजाऱ्याकडून उपचार करून घेतात. पण त्यात अनेक वेळा रुग्णाची प्रकृती गंभीर होऊन प्रसंगी प्राणही गमवावे लागतात. ही स्थिती येऊ नये म्हणून लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड सुरजागडचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन यांच्या संकल्पनेतून हेडरी येथे लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलची उभारणी वर्षभरापूर्वी करण्यात आली. सुरजागड खाण परिसरातील अनेक गावातील नागरिकांना या रुग्णालयातून निःशुल्क सेवा दिली जात आहे.

आधुनिक सुविधा आणि तज्ज्ञांची सेवा

या 30 खाटांच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये समाजातील सर्व घटकांना सर्व मुलभूत आणि अत्याधुनिक सेवा पुरविली जाते. उपलब्ध सुविधांपैकी प्रसुती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, अस्थिव्यंगतज्ज्ञ, जनरल सर्जन, जनरल मेडीसीन, त्वचारोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, कान-नाक-घसा तज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, अतिदक्षता विभागात एनआयसीयू, बाह्यरुग्ण विभाग आणि आंतररुग्ण विभागाकरिता एकूण 12 अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार, 40 कौशल्यपूर्ण नर्स व सहकारी स्टाफद्वारे तीन पाळीत 24 तास सेवा दिली जात आहे. निदान सुविधांमध्ये पॅथॅालॅाजी, सोनोग्राफी, डिजिटल एक्सरे, ईसीजी टीएमटी, स्पायरोमेट्री, ऑडिओमेट्री, वैदू चिकित्सालयात नैसर्गिक पद्धतीने उपचार, तसेच गावातील वैद्य याद्वारे उपचार व मार्गदर्शन केले जाते. वर्षभरात 61,000 पेक्षा अधिक रुग्णांवर दवाखान्यात उपचार करण्यात आले. तसेच 100 वर यशस्वी प्रसुती या दवाखान्यात झाल्या आहेत.

जनजागृतीसह मुली व महिलांना साहित्य वाटप

या रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सोमवार ते शनिवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत, तसेच आपत्कालीन सेवा 24 तास उपलब्ध असते. अतिरिक्त सेवा म्हणून ग्रामपंचायत पुरसलगोंदी, नागुलवाडी व तोडसा अंतर्गत गावातील लोकांना मोफत रुग्णवाहिका सेवा, ग्रामपंचायत पुरसलगोंदी, नागुलवाडी व तोडसाअंतर्गत गावातील गर्भवती महिलांना तपासणी व प्रसुतीसाठी मोफत ॲम्बुलन्स 24 तास उपलब्ध ठेवली जाते. ग्रामपंचायत पुरसलगोंदी, नागुलवाडी व तोडसाअंतर्गत गावातील कुपोषित मुले व मुली कुपोषणमुक्त बालक कार्यक्रमाअंतर्गत दवाखान्यामध्ये उपचार व आहार पुरवठा घेतात. सिकलसेल, अॅनेमिया, मलेरिया, हिवतापाबाबत मोफत उपचार व मार्गदर्शन केले जाते. सर्व गावांमध्ये प्रथमोपचार पेटीद्वारे तात्काळ उपचार व माहिती देणे, सखी-सहेली कार्यक्रमाअंतर्गत 2216 गावातील महिला व किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी पॅडचे वितरण करून जनजागृती करण्यात आली. या सर्व सेवांमुळे हा दवाखाना परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.

डॅाक्टर आणि नर्सिंग स्टाफचा सत्कार

लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलच्या वर्षपूर्तीनिमित्त रविवारी (दि.8) केक कापून मोठ्या उत्साहात पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी या दवाखान्यात सेवा देणारे डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि सर्व कर्मचाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यासोबतच सर्व तीन ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच आणि गाव पाटीलांचेही शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी लॅायड्स कंपनीचे साई कुमार, बलराम सोमनानी, डॉ.सनी सलुजा, वेदांत जोशी, कर्नल (निवृत्त) विक्रम मेहता, सुनीता मेहता, रोमित तोंबर्लावार, संजय चांगलानी, टी.ए.भास्कर, राम कुमार, अरुण रावत, हेडरीचे पोलीस उपनिरीक्षक दुल्हत, डॉ.गोपाल रॉय, डॉ.चेतन बुरिवार, डॉ.प्रीती बुरिवार, पुरसलगोंदीच्या सरपंच अरुणा सडमेक, उपसरपंच राकेश कवडो, नागुलवाडीचे उपसरपंच राजू तिम्मा, तोडसाच्या सरपंच वनिता कोरामी, हेडरीचे माजी उपसरपंच कटिया तेलामी, सुरजागडचे भूमिया लालसाय तलांडे, पुरसलगोंदीचे ग्रा.पं.सदस्य मधुकर सडमेक, नागुलवाडीचे पोलीस पाटील माधव गावडे, पेठाचे पोलीस पाटील दस्सा कोरामी, कारंपल्लीचे लालसु रापन, मलमपाडीचे बेंजामिन टोप्पो, इतुलनारचे संजय जेट्टी, अलेंगाचे दिनेश पुंगाटी, तोडसा ग्रा.पं.चे सदस्य विनोद नरोटी, कुदरीचे प्रतिष्ठित नागरिक देऊ पुंगाटी, भूमिया साधू गुंडरू, हेडरीचे झुरू कावडो, मंगेरचे पोलीस पाटील गोसू हिचामी, बांडेचे पेकाजी गुंडरू, बोडमेटाचे बिरजू गावडे एकरा खुर्दचे संभाजी गोटा, झारेवाडाचे रैनु नरोटे या पोलीस पाटलांसह नितीन तोडेवार, बाजू मट्टमी, पिपली बुर्गीचे सरपंच मुन्ना पुंगाटी, सुरजागडच्या माजी सरपंच कल्पना आलम, बोडमेटा येथील झुरु मासु गोटा, हेडरीचे देवजी पाटील, मंगरचे गाव पाटील गोसुजी हिचामी, हलूरचे लाचु पाटील हेडो, बांडे येथील साधू गुंडरु, हेडरीचे मंगू कलमोती, हेडरीचे जुरु कावडो, अशोक हिचामी, बाजी गुंडरु, रामजी गुंडरु असे परिसरातील अनेक गावातील सरपंच, पोलीस पाटील, गाव पाटील आणि भूमिया या कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित होते.