रेती तस्करीसाठी कुप्रसिद्ध कोंढाळ्यात घरकुलधारकांना पाच ब्रास मोफत रेती

झिरो रॅायल्टी पासमुळे मिळणार दिलासा

देसाईगंज : तालुक्यातील कोंढाळा येथील मेंढा घाटावरून रेती तस्करीचे प्रमाण वाढले असताना आता प्रशासनाने उशिरा का होईना, घरकुलधारकांना पाच ब्रास रेती मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा शुभारंभ दि.10 ला करण्यात आला.

घरकुलधारकांना बांधकामासाठी पाच ब्रास रेती देण्याची परवानगी देण्यात आल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील घरकुलधारकांना मोफत रेती मिळावी यासाठी सरपंच संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन मागणी केली होती. अपर्णा राऊत यांनी त्यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन या मागणीचा पाठपुरावा केला.

रेती मिळत नसल्याने घरकुलांचे बांधकाम थंडबस्त्यात पडले होते. काही घरकुलधारकांनी चोरीची रेती वाढीव दराने खरेदी करून घरकुलांचे बांधकाम पूर्ण केले. पण रेतीसाठी अतिरिक्त पैसे देणे बहुतांश जणांना शक्य झाले नाही. आता शासनाने आपल्या योजनेप्रमाणे झिरो रॉयल्टी पास देऊन घरकुलधारकांना पाच ब्रास रेती नेण्यास हिरवी झेंडी दिल्याने घरकुलधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.