बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राबविणार पंचसुत्री

आदिवासी विकास परिषदेचा पुढाकार

गडचिरोली : येत्या 15 नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आदिवासी (जनजाती) गौरव दिवस साजरा करण्यासोबत पुढील वर्षभर विविध कार्यक्रम घेतले जाणार असल्याची माहिती अ.भा.आदिवासी विकास परिषद नवी दिल्लीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॅा.देवराव होळी यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. त्यासाठी पंच परिवर्तन सूत्र राबविणार असल्याचे ते म्हणाले.

आदिवासी समाजात जागरूकता निर्माण करणे, मानवी हक्कांचे संरक्षण व संवर्धन आणि त्यावरील उपाययोजना करण्यासाठी 15 नोव्हेंबरला देशभरात भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी केली जाते. या जयंतीपासून वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये समाजहित व सर्वांगिन विकासाकरिता पंच परिवर्तनाची पाच सूत्रं आदिवासी बांधवांनी स्वीकारावी, असे आवाहन डॅा.होळी यांनी केले.

त्या पंचपरिवर्तन सुत्रात कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्य, स्व:जागृती अशा पाच मुद्द्यांचा समावेश आहे.

पत्रकार परिषदेला अ.भा.आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा महासचिव उमेश उईके, जिल्हा सचिव सुरज मडावी, उपाध्यक्ष वामन जुनघरे, जिल्हा महिला शाखेच्या अध्यक्ष पुष्पलता कुमरे, तसेच भूषण अलामे, लिना कोकोडे, निलेश आत्राम, अमित तलांडे, विद्या दुग्गा, श्याम सलामे आदी उपस्थित होते.