गडचिरोली : आजपासून पाच वर्षांपूर्वी, म्हणजे 1 मे 2019 रोजी गडचिरोली जिल्ह्यातल्या कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडाजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात पोलिसांच्या क्युआरटी पथकाच्या 15 जवानांना शहीद व्हावे लागले. ज्या खासगी वाहनाने हे जवान जात होते त्या वाहनाच्या चालकाचाही या घटनेत मृत्यू झाला. पण शहीद पोलिसांप्रमाणे माझ्या मुलालाही शहीदाचा दर्जा देऊन माझ्या कुटुंबियांना शहीदांच्या कुटुंबाप्रमाणे सवलतींचा लाभ देण्याची अपेक्षा पूर्ण झाली नाही, अशी खंत वाहनचालकाच्या पित्याने व्यक्त केली.
अशी घडली होती घटना
जांभुळखेडा दुर्घटनेच्या आधल्या दिवशी, म्हणजे 30 एप्रिल 2019 रोजी रात्री नक्षल्यांनी कुरखेडा तालुक्यातील दादापूर (रामगड) येथे रस्त्याच्या कामावरील 27 वाहने आणि अन्य यंत्रसामग्री जाळली होती. या घटनेनंतर पोलिसांची वाहने त्या भागात जातील याची नक्षलवाद्यांना खात्री होती. त्यामुळे त्या मार्गावर असलेल्या जांभुळखेडाजवळच्या पुलाजवळ नक्षलवाद्यांनी आधीच शक्तीशाली भूसुरूंग पेरून ठेवला होता. कुरखेडाच्या तत्कालीन एसडीपीओनी नक्षलवाद्यांचा तो ट्रॅप समजून न घेता 1 मे रोजी सकाळी कुरखेडा येथून क्युआरटीच्या (शिघ्र कृती पथक) जवानांना तातडीने दादापूरकडे जाण्यास सांगितले. भूसुरूंगरोधक वाहन उपलब्ध नसल्यामुळे ते 15 जवान एका टाटा एस या खासगी मालवाहू वाहनाने तिकडे जाण्यासाठी निघाले. त्यांच्या येण्याची वाट पाहात टपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी त्याचवेळी मुख्य मार्गावर भूसुरूंग स्फोट घडवून त्यांचे वाहन उडवले. यात त्या 15 जवानांसह वाहनचालक म्हणून आलेल्या तोमेश्वर शिंगनात या युवकालाही प्राण गमवावे लागले.
मुख्यमंत्र्यांनी केले सांत्वन, पण…
गेल्या पाच वर्षातील नक्षलवाद्यांनी घडवलेली ती सर्वात मोठी हिंसक घटना ठरली. मृत जवानांना श्रद्धांजली वाहन्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीत आले होते. यावेळी जवानांच्या परिवारासोबत त्यांनी मृत खासगी वाहनचालकाचे वडील भागवत शिंगनात यांचेही सांत्वन केले. पण आपण त्यावेळी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केलेली अपेक्षा अद्याप पूर्ण झालेली नाही, अशी खंत शिंगनात यांनी बोलून दाखविली.