गडचिरोली : लोकशाहीचा उत्सवदिन असलेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिसंवेदनशिल नक्षलग्रस्त असलेल्या विसामुंडी आणि इरपनार या गावांमध्ये जाऊन सी-६० जवानांनी तिरंगा ध्वज फडकविला. यापूर्वी नक्षलवाद्यांकडून या भागात काळा ध्वज फडकवला जात होता. पण त्यांचे मनसुबे हाणून पाडत गावकऱ्यांच्या साक्षीने तिरंगी ध्वज फडकविण्यात आला.
अपर पोलिस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) एम.रमेश यांच्या नेतृत्वात पोलिस मदत केंद्र येमली-बुर्गी आणि दोन सी-60 पथकांनी 18 किमी पायी अभियान करत विसामुंडी येथे भेट दिली आणि गावकऱ्यांसोबत प्रजासत्ताक दिन साजरा केला. तसेच उपविभाग भामरागडअंतर्गत मौजा इरपनार या गावात उपविभागीय पोलीस अधिकरी नितीन गणापुरे यांच्या नेतृत्वात धोडराज पोलिस स्टेशन आणि दोन सी-60 पथकांनी 10 किमी पायी अभियान करत ध्वजारोहण करुन प्रजासत्ताक दिन साजरा केला.
यासोबतच गेल्या एका वर्षात नव्याने उभारलेल्या मन्नेराजाराम, पिपली बुर्गी, वांगेतुरी व गर्देवाडा या पोलिस स्टेशन, मदत केंद्रातही संबंधित पोलिस अधिकारी व अंमलदारांनी गावकऱ्यांसोबत ध्वजारोहण करुन प्रजासत्ताक दिन साजरा केला.
पदकप्राप्त अंमलदारांना प्रशस्तीपत्र
पोलिस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलिस दलातील 18 अधिकारी व अंमलदार यांना राष्ट्रपती यांचे शौर्य पदक व एका अंमलदाराला गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले होते. सदर पदक विजेत्यांचा यावेळी प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.