अहेरी : तालुक्यातील पेरमिली ईलाका पट्टीमधील गढी दसऱ्यासाठी अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी हक्काची जागा मिळवून दिली. या जागेवर त्यांच्याच हस्ते पारंपरिक पद्धतीने सप्तरंगी ध्वजारोहण करण्यात आले. या जागेवर 50 गावांमधील नागरिक एकत्र येऊन दरवर्षी पारंपरिक पद्धतीने गढीपुजा करतील. यात पुजाअर्चनेसह रात्री आदिवासी समाजाची सांस्कृतिक परंपरा प्रदर्शीत करणाऱ्या वाद्यवृंदाच्या तालावर नृत्यही सादर करण्याची परंपरा आहे.
सदर जागेवर पेरमिली ईलाका पट्टीतील 50 गावांमधील शेंडीया, गायता, भूमिया, पेरमा, वड्डे यांच्यासह पट्टीमध्ये असलेले सर्व समाजातील नागरिक एकत्र येऊन दरवर्षी गढी पुजा करत असतात. तसेच पेरमिली ईलाका गढी पुजा आणि गढी दसऱ्याचे सर्व कार्यक्रम आदिवासी समाजाकडून पारंपरिक पद्धतीने केले जातात. यात पुजा करून रात्री आदिवासी समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या ढोल, रेला पटांगसह मोठ्या उत्साहाने पेरमिली ईलाक्याच्या वतीने गढी दसऱ्याचा कार्यक्रम साजरा केला जातो. या महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक परंपरेसाठी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी जागा मिळवून दिल्याने त्यांच्याच हस्ते झेंडावंदन सुध्दा करण्यात आले.