गडचिरोली : संततधार पाऊस आणि गोसीखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या विसर्गामुळे गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती आजही कायम आहे. बुधवारी पावसाने थोडी उसंत घेतली असली तरीही संध्याकाळी 22 मार्गांवरील वाहतूक बंद झाली होती. आज संध्याकाळपर्यंत ग्रामीण भागातील काही मार्गावरील वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे, मात्र गडचिरोली ते आरमोरी आणि गडचिरोली ते चामोर्शी या मुख्य मार्गावरील वाहतूक तिसऱ्याही दिवशी बंद राहण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी शेतातून घरी परत येताना खुरजा देशपूर (ता.आरमोरी) येथील राजू विश्वनाथ तुमराम (46 वर्ष) हे शेतकरी नाल्याच्या पुरात वाहून गेले. गेल्या दोन दिवसात पाऊस आणि वैनगंगा नदीच्या पुराचा सर्वाधिक फटका देसाईगंज परिसराला बसला आहे. देसाईगंजच्या सावंगी येथील 16 आणि हनुमान वॅार्ड, विर्शी तुकूम येथील 35 नागरिकांना जिल्हा परिषद शाळा आणि शिव मंदिरात आश्रय देण्यात आला आहे. याशिवाय गडचिरोलीजवळच्या कोटगल बॅरेजवरील 132 मजुरांना सुरक्षेच्या दृष्टिने खासगी आश्रयस्थानांमध्ये हलविण्यात आले आहे.
गडचिरोली शहरातून आणि उत्तर आणि दक्षिण भागात जाणारे मार्ग बंद असल्याने एसटीच्या अनेक प्रवाशांना याचा फटका बसला आहे. हे मार्ग सुरू होतील या आशेने बुधवारी प्रवासी बस स्थानकात आले होते, पण त्यांना मनस्ताप सहन करत आल्यापावली परत जावे लागले. नागपूरकडे जाणारे काही प्रवासी मूल मार्गे जात आहेत.
बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद असलेले मार्ग
1) गडचिरोली ते आरमोरी रस्ता राष्ट्रीय महामार्ग 353 सी (पाल नदी, कोलांडी नाला, गाढवी नदी)
2) गडचिरोली ते चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग 353 सी (गोविंदपूर नाला, शिवणी नाला)
3) कुरखेडा ते वैरागड राज्यमार्ग 377, (तालुका आरमोरी / कुरखेडा)
4) अहेरी ते वटरा-बेजुरपल्ली-परसेवाडा राज्यमार्ग 370 (वटरा नाला) तालुका अहेरी
5) मांगदा ते कलकुली प्रजिमा 50 (तालुका आरमोरी)
6) कढोली ते उराडी रस्ता प्रजिमा 7, ता.कुरखेडा (लोकल नाला )
7) चातगाव ते रांगी-पिसेवाडा प्रजिमा 36, तालुका आरमोरी
8) शंकरपूर ते जोगीसाखरा – कोरेगाव चोप प्रजिमा 1, तालुका देसाईगंज
9) आष्टी ते उसेगाव- कोकडी तुळसी – कोरेगाव प्रजिमा 49, तालुका देसाईगंज
10) वैरागड ते देलनवाडी प्रजिमा 8, तालुका आरमोरी
11) चौडमपल्ली ते चपराळा प्रजिमा 53, तालुका चामोर्शी
12) अरसोडा ते कोंढाळा-कुरूड- वडसा प्रजिमा 47, तालुका देसाईगंज
13) भेंडाळा ते बोरी- अनखोडा प्रजिमा 17, (हळदीमाल नाला, अनखोडा नाला) तालुका चामोर्शी
14) शिवणी ते चंदागड-शिरपूर प्रजिमा 35, तालुका कुरखेडा
15) अमिर्झा ते मौसिखांब प्रजिमा 57, तालुका गडचिरोली
16) वडसा वळण मार्ग, तालुका देसाईगंज
17) आरमोरी ते जोगीसाखरा-शंकरनगर प्रजिमा 48, तालुका आरमोरी (गाढवी नदी)
18) चामोर्शी ते मार्कंडादेव प्रजिमा 37, तालुका चामोर्शी
19) खरपुंडी ते दिभना-बोदली प्रजिमा 44, तालुका गडचिरोली
20) वडसा ते नैनपूर – कोकडी प्रजिमा 32, तालुका देसाईगंज
21) आरमोरी ते अरसोडा प्रजिमा 47, तालुका आरमोरी
22) वेलतूर ते एकोडी प्रजिमा 55, तालुका चामोर्शी