पावसाचा जोर कमी, पण धरणातील विसर्गामुळे पूर कायम, शाळांना सुटी

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

गोदावरी नदीवर उभारलेल्या तेलंगणा सीमेवरील मेडीगड्डा धरणातून सुरू असलेला विसर्ग

गडचिरोली : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर सोमवारी रात्रीपासून कमी झाला आहे. पण धरणांमधून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नद्यांचा पूर कायम आहे. सोमवारी रात्रीपर्यंत जिल्ह्यातील 33 मार्गांवरील वाहतूक बंद होती. गडचिरोली-आरमोरी, गडचिरोली-चामोर्शी हे मार्गही मंगळवारी सकाळपर्यंत बंद होते. जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारसाठीही शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे. दरम्यान जिल्हाधिकारी संजय दैने यांनी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पुराचे पाणी ओसरल्यानंतर पुरग्रस्त गावांमध्ये साथरोग पसरू नये म्हणून पाण्याचे स्रोत प्राधान्याने स्वच्छ करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीचा तालुकानिहाय आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, पोलीस अधीक्षक निलोत्पल, सहायक जिल्हाधिकारी राहुल मीना, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, बांधकाम विभागाचे अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

पूर ओसरल्यावर मच्छर होऊ नये म्हणून गावागावांत फवारणी करून घ्यावी. हॅण्डपंप, विहिरी आदी पिण्याच्या पाण्याची ठिकाणे ब्लिचिंग टाकून स्वच्छ करावी. रस्त्यावरील खड्डे बुजवून घ्यावे, विद्युत प्रवाह सुरळीत करणे, पाणी वाहत असताना नदी नाल्यांच्या रपट्यावरून कोणालाही जाऊ देऊ नये, त्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवणे आदी सूचना दिल्या. पूर पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत असतात, यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामीण रूग्णालयात खबरदारी म्हणून आगावू रक्तपिशव्या उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचना दिल्या. यासाठी रक्तदात्यांकडून रक्तदान करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी पोलीस जवानांकडूनही रक्तदान उपलब्ध करता येईल, असे सांगितले. पूर परिस्थितीमध्ये कोणत्याही मदतीसाठी रात्री-अपरात्री पोलीस विभाग तयार असल्याचे सांगून सर्व यंत्रणेने आपसी समन्वय ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

अहेरी उपविभागाचा आढावा

अहेरी उपविभागाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी तहसील कार्यालय अहेरी येथे सोमवारी सकाळी पूर परिस्थिती, पीक परिस्थिती, रस्ते व आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. पुरामुळे बाधित मार्गाची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी, शेती पिकांचे, घरांचे, पशुधनाचे व इतर नुकसानीबाबत अद्यावत माहिती संकलित करून तात्काळ पंचनामे करावे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत स्वच्छ करणे, सर्व विभागांचे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयी राहणे व टीमवर्कने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

50 तासानंतर पर्लकोटावरच्या पुलाने घेतला मोकळा श्वास

भामरागडच्या पर्लकोटा नदीवर शनिवारी दुपारी पाणी चढून अनेक गावांचा संपर्क तुटला होता. सोमवारी पुलावरचे पाणी ओसरले. पण इकडून तिकडे जाण्यासाठी आसुसलेल्या नागरिकांना प्रशासनाने लगेच नदी पार करणे धोकादायक असल्याचे सांगत रोखले. यावेळी भामरागडचे एसडीपीओ अमर मोहीते, ठाणेदार दीपक डोम्ब यांनी सुरक्षेसाठी जवानांना तैनात केले. त्यानंतर तहसीलदार किशोर बागडे, नायब तहसीलदार तथा नगर पंचायत मुख्याधिकारी प्रकाश पुप्पलवार यांनी नगर पंचायतच्या यंत्रणेमार्फत पुलावर जमा झालेला कचरा, गाळ जेसीबीच्या सहाय्याने काढला. त्यानंतर एसडीआरएफच्या चमुने पूलवरून जाणे सुरक्षित असल्याची खात्री करून नंतर पायी जाणारे, दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनांना शिस्तबद्धपणे पुलावरून सोडले.

मेडीगड्डामुळे सिरोंचा तालुक्याला फटका

संततधार पावसाचा फटका सिरोंचा तालुक्याला बसला आहे. सिरोंचा येथील प्राणहिता नदी दुथडी भरून वाहात पूरस्थिती वाढली आहे. रविवारी सकाळी 6 वाजेपर्यंत मेडीगड्डा बॅरेजमध्ये 3,73,500 क्युसेक पुराच्या पाण्याची आवक सकाळी 10 वाजेपर्यंत 4,87,010 क्युसेकवर पोहोचली. सायंकाळी 6 वाजता 5,52,600 क्युसेक आणि सोमवारी पहाटे 3 वाजता 7,55,910 क्युसेकवर आवक पोहोचली. सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 8,68,850 वर पाण्याची आवक वाढल्याने प्राणहिता नदीच्या बॅकवॅाटरचा फटका सिरोंचावासियांना बसत आहे. गोदावरीच्या पाणलोट क्षेत्रातील पिके आधीच जलमय झाली आहेत. याशिवाय मेडीगड्डाच्या सर्व 84 गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने अनेक गावांतील पिकेही पाण्याखाली गेली आहेत.