गडचिरोली : संततधार पाऊस आणि विविध धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे गोदावरी नदीतील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. मेडीगड्डा बॅरेजमधूनही पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे सिरोंचा उपविभागात गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे व आवश्यकतेनुसार शासकीय निवारागृहात आश्रय घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे. दरम्यान पाऊस आणि पूरस्थिती पाहता आज (दि.20) सिरोंचा तहसीलदारांनी शाळांना सुटी जाहीर केली आहे.
गोदावरी उपखोऱ्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तेलंगणा राज्यातील कड्डम प्रकल्प तसेच श्रीपदा येलमपल्ली प्रकल्पातून पाण्याच्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. यासोबतच वर्धा, वैनगंगा व प्राणहिता नद्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे या नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. गोदावरी नदीच्या विसर्गाची क्षमता 9 लाख क्युसेक असून सध्या 5 ते 6 लाख क्युसेकपर्यंत पाण्याचा प्रवाह सुरू आहे. मात्र विविध प्रकल्पातील विसर्गामुळे यात अजून 6 लाख क्युसेकपर्यंत वाढ होण्याची शक्यता असल्याने सिरोंचा तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते.
जिल्हाधिकारी पंडा यांनी राज्य आपत्ती पथकाच्या दलाला तसेच महसुल, पोलीस, ग्रामपंचायत व इतर यंत्रणांना सतर्क राहण्याच्या व आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.