भामरागड : छत्तीसगडमधील जोरदार पावसामुळे तिकडून वाहात येणाऱ्या इंद्रावती, पर्लकोटा नद्यांना मोठा पूर येऊन पुराचे पाणी भामरागडमध्ये शिरले होते. बुधवारी संध्याकाळी पूर ओसरण्यास सुरूवात झाली होती. त्यामुळे आज (गुरूवारी) पर्लकोटावरील पूल काही वेळात वाहतुकीसाठी मोकळा केला जाणार आहे. दरम्यान बुधवारी पहाटे एसडीआरएफच्या चमुने ज्या गरोदर महिलेला मोटारबोटच्या सहाय्याने पुराच्या पाण्यातून सुरक्षितपणे ग्रामीण रुग्णालयात हलविले त्या महिलेने एका गोंडस कन्येला जन्म दिला. ते बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत.
भामरागड तालुक्यातील हिंदेवाडा येथील गर्भवती महिला अर्चना विकास तिम्मा ही प्रसुतीची वेळ आली असताना गावातच होती. तिची संभाव्य प्रसुती लक्षात घेताना आणि गावातून बाहेर पडण्याची मार्ग अडलेला असताना प्रशासनाने तत्परता दाखवली. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या सूचनेनुसार रात्री 11 वाजता सिरोंचा येथून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) पथक भामरागड येथे रवाना करण्यात आले. या पथकाने पहाटे 4 वाजता मोटारबोटच्या सहाय्याने हिंदेवाडा गावात पोहोचून त्या गरोदर अर्चनाला मोटारबोटमधून भामरागडला आणले आणि ग्रामीण रुग्णालयात भरती केले. यानंतर त्या महिलेने एका कन्यारत्नाला जन्म दिला. प्रशासनाच्या तत्परतेने महिलेची प्रसुती व्यवस्थित होऊ शकली.
दरम्यान भामरागडच्या मुख्य बाजारपेठेत पर्लकोटा नदीचे पाणी शिरल्याने 30 ते 35 दुकानदारांचे थोडे नुकसान झाले. संभाव्य पुराची चाहुल लागल्यानंतर प्रशासनाच्या सूचनेनुसार व्यापाऱ्यांनी रात्रीच आपले साहित्य सुरक्षित स्थळी हलविल्याने मोठे नुकसान टळले.