गडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण भागातील अहेरी, सिरोंचा आणि भामरागड हे तालुके वगळता उर्वरित भागातील पूरस्थिती आता सावरत आहे. त्यामुळे मुख्य मार्गांसह ग्रामीण भागातील बहुतांश मार्गही सुरू झाले आहेत. तब्बल आठवडाभर पूरस्थिती कायम असल्याने पाण्याचे स्रोत दूषित आहेत. शिवाय जिकडे-तिकडे पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती वाढणार आहे. अशा स्थितीत जलजन्य आणि कीटकजन्य आजारांपासून वाचण्याचे आव्हान निर्माण होणार आहे. संभाव्य आजार टाळण्यासाठी जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग विविध उपाययोजना राबवत आहे.
नागरिकांनी पावसाळ्यात जलजन्य व कीटकजन्य आजारांबाबत काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. त्यासाठी जनजागृती करून सर्व विभागांच्या समन्वयाने विविध उपयोजना राबवल्या जात आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साथरोग नियंत्रण कक्ष सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र , तालुकास्तर तसेच जिल्हास्तरावर कार्यान्वित आहे. जलजन्य व कीटकजन्य आजारांची साथ उद्भवल्यास तात्काळ नियंत्रण मिळवले जाणार आहे. तसेच हिवताप विभागामार्फत साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे, कंटेनर तपासणी, नियमित ताप रुग्ण सर्व्हेक्षण चालू आहे. दर मंगळवारला कोरडा दिवस व दर शनिवारी गप्पी मासे सोडण्याचा दिवस याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पंकज हेमके यांनी सांगितले . जलजन्य आजारांबाबत पाणी शुद्धीकरण, ब्लिचिंग पावडर तसेच मेडिक्लोरचा योग्य वापर करण्याबाबत साथरोग अधिकारी डॉ.रुपेश पेंदाम यांनी सूचना दिल्या आहेत.
जलजन्य आजार टाळण्यासाठी हे लक्षात ठेवा
शिळे आणि उघड्यावरील अन्न खाऊ नका, घरात आणि घराभोवती माशा होऊ नयेत यासाठी स्वच्छता ठेवा, साथीच्या काळात पिण्याचे पाणी उकळून आणि थंड करून प्या, लहान मुले आणि गरोदर महिला यांना पिण्याचे पाणी उकळून थंड करून द्या, पिण्याचे पाणी स्वच्छ आहे याची खात्री करा, गावाच्या परिसरातील पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण नियमित होत आहे ना याबाबत खातरजमा करा, ज्या ठिकाणी स्वच्छता पाळली जात नाही अशा हॉटेल किंवा इतर ठिकाणी खाणे, पाणी पिणे टाळा, बाहेरील बर्फ खाणे टाळा, घराबाहेर पडताना प्रवासात आपल्यासोबत पाणी ठेवा, जेणेकरून कुठलेही पाणी पिण्याची वेळ येणार नाही.
तसेच कीटकजन्य आजार टाळण्यासाठी दर आठवड्याला घरातील पाण्याची भांडी रिकामी करा व आतून स्वच्छ घासून पुसून घ्या, रिकामे न करता येणाऱ्या भांड्यांमध्ये दर आठवड्याला आरोग्य कर्माचाऱ्यांमार्फत अळीनाशक द्रावण (टेमीफॉस) टाका, घरावरील तसेच घरातील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण लावा, जुने टायर्स, नारळाच्या करवंट्या, पाणी साचू शकेल अशा फुटलेल्या बाटल्या, प्लास्टिकच्या वस्तू अशा निरुपयोगी वस्तू घराभोवती साठू देऊ नका, घरातील मच्छरदाण्या, कुलर्स, फ्रिज यामध्ये साचलेले पाणी दर दोन-तीन दिवसांनी काढा.