गडचिरोली : जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून निर्माण झालेली पूरस्थिती आता निवळली आहे. भामरागडमधील पर्लकोटा नदीचे पाणी गुरूवारी सकाळी ओसरले आणि पुल व रस्त्यावरील चिखल साफ केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरू झाली. दुसरीकडे गोदावरी नदीत आणि मेडिगड्डा बॅरेजमधून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्याने सिरोंचा तालुक्यातील काही गावांचा असलेला पुराचा धोका तूर्त टळला आहे.
सिरोंचा तालुक्यात संभाव्य पूरस्थिती पाहता नागपूर येथून एनडीआरएफच्या चमुलाही पाचारण करण्यात आले होते. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या आयआरएस प्रणालीमुळे संभाव्य धोका टाळणे शक्य झाले. विविध यंत्रणांनी समन्वय ठेवत आणि तत्परतेने उपाययोजना राबविण्यासंदर्भात पावले उचलल्यामुळे नुकसारकारक परिस्थिती टाळणे बऱ्याच अंशी शक्य झाले.
आतापर्यंत 1045 मिमी पाऊस
जिल्ह्यात सरासरीनुसार 1 जून ते 21 आॅगस्ट दरम्यान 927.7 मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात 1045 मिमी पाऊस बरसला. सरासरीच्या तुलनेत हा पाऊस 112.6 टक्के आहे. 1 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत म्हणजे संपूर्ण पावसाळ्यात सरासरी 1254.1 मिमी एवढा पाऊस पडणे अपेक्षित असते. त्यापैकी आतापर्यंत प्रत्यक्ष पडलेला पाऊस 1045 मिमी म्हणजे पावसाळ्यातील चार महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत 83 टक्के एवढा झाला आहे. सर्वाधिक 1367 मिमी पाऊस देसाईगंज तालुक्यात झाल्याचे दिसून येते.
दरम्यान या चार दिवसात पुरामुळे भामरागड तालुक्यात दोन जणांचा बळी गेला. याशिवाय काही घरांचे आणि शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील महसूल यंत्रणेने लवकरात लवकर सर्व्हेक्षण करून पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले आहे.