गडचिरोली : गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती आता बऱ्याच अंशी निवळली आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत बंद असलेले 5 मार्गही आज सकाळी सुरू झाले आहेत. मात्र नदी-नाल्यांच्या परिसरातील शेतांमधील कोवळे धानपीक पुराच्या पाण्याने खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आता नुकसानीच्या पंचनाम्यांना वेग येणार आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

सर्व शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकले होते. अर्ध्याअधिक शेतकऱ्यांची रोवणीही आटोपली होती, तर काही शेतकरी बांधीत पुरेसे पाणी जमा होण्याची प्रतीक्षा करत होते. पण पावसाने उसंतच घेतली नाही. त्यातच मोठ्या प्रमाणावर गोसीखुर्दचे पाणी सोडल्याने सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली.
अनेक शेतात आठवडाभर पाणी जमलेले असल्याने धानाचे कोवळे रोप सडले. त्यामुळे लागवड खर्चासह रोपांना दिलेले खतही वाया गेल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. अशा स्थितीत आता दुबार पेरणी करण्यासाठी पऱ्हे टाकण्याची वेळ निघून गेल्याने शेतकऱ्यांना आवते पद्धतीने धानाची पेरणी करावी लागणार आहे.
पुरात वाहून गेलेल्याचा मृतदेह सापडला
आरमोरी तालुक्यातल्या कुरंजा गावातील राजू विश्वनाथ तुमराम (45 वर्ष) हे नाल्याच्या पुरात वाहून गेले होते. त्यांचा मृतदेह देलोडा खुर्द गावाजवळील शेतालगतच्या झुडूपात आढळला. ते 8 जुलै रोजी बांधकामावरील मजुरीचे काम आटोपून सायकलने आपल्या गावाला जात असताना वडधा ते देवीपूर मार्गावरच्या नाल्याच्या पुरात सायकलसह वाहून गेले होते.