गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागडअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेतील 70 विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांना उलटी, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्रीचे जेवण घेतल्यानंतर एका विद्यार्थ्याला पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर दि.28 जानेवारीला सकाळी एकामागून एक 70 विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. या विद्यार्थ्यांना सुरूवातीला लाहेरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर 40 विद्यार्थ्यांना भामरागड तालुका मुख्यालयात पाठविण्यात आले. सध्या सर्व विद्यार्थी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीत आहेत.
सध्या लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 30 विद्यार्थी आणि भामरागड तालुका मुख्यालयातील ग्रामीण रुग्णालयात 40 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे भामरागड येथे उपचारार्थ दाखल केलेल्या 40 विद्यार्थ्यांपैकी 1 विद्यार्थी आणि 1 विद्यार्थिनी अशा दोन विद्यार्थ्यांची प्रकृती जास्त बिघडलेली असल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या विद्यार्थ्यांना विषबाधा नेमकी कशी झाली याचा तपास सुरू आहे.
































