देसाईगंज : वन विभागाकडून 1 ते 7 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून देसाईगंज वनविभागाकडून कोंढाळाच्या जंगल परिसरातील ओढ्यावर टाकावू वस्तूंपासून बंधारा बांधण्यात आला. वनकर्मचाऱ्यांनी श्रमदान करून निर्माण केलेल्या या बंधाऱ्यामुळे त्या परिसरातील वन्यप्राण्यांना जंगलात बारमाही पाणी उपलब्ध होणार आहे.

कोंढाळा जंगल परिसरात वाघाचा वावर आहे. याशिवाय दुसरेही प्राणी आढळून येतात. मात्र उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे जंगलातील नैसर्गिक पाणवठ्यातील पाण्याची पातळी कमी होऊन प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. यातूनच अनेक वेळा ते गावाकडे धाव घेत असतात. असे प्रसंग टाळण्यासाठी जंगलातून वाहात जाणाऱ्या नाल्याचे पाणी अडवण्यासाठी वनबंधारे उभारण्याचा निश्चय करण्यात आला.
क्षेत्र सहायक संदीप शेंडे यांनी वनरक्षक, ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकऱ्यांना घेऊन कोंढाळा जंगल परिसरातील जास्त प्रमाणात वाहणाऱ्या नाल्यावर टाकाऊ वस्तूंचा वापर करीत त्याच्यामध्ये माती भरून 18 फूट लांब आणि 4 फूट रूंद अशा बंधाऱ्याची उभारणी केली.
यासाठी सरपंच अपर्णा राऊत, क्षेत्र सहायक संदीप शेंडे, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष कैलास राणे, ग्रा.पं.सदस्य शेषराव नागमोती, संदीप वाघाडे, भुमेश्वरी गुरनुले, वनरक्षक निलिमा सेलोटे, वनरक्षक निलेश पंधराम, मिथुन अहिर, मयुरी कळमकर, सुरेश रामटेके, अरुण दुपारे, दिलीप भुते, ओमकार चौधरी आदींनी श्रमदान केले.
















