गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील पोटेगावच्या सेतू केंद्रात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या अर्जांची 20 रुपये दराने विक्री केली जात असल्याची बातमी ‘कटाक्ष’ने प्रकाशित करताच जि.प.सीईओ आयुषी सिंह यांनी याची तातडीने चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार गटविकास अधिकारी सुरेंद्र गोंगले यांनी लगेच पोटेगाव गाठून शहानिशा केली. अर्जाच्या पीडीएफ फाईलच्या प्रिंटआऊटसाठी पैसे घेतल्याची कबुली संबंधिताने दिली. त्याबद्दल त्याला तंबी देत कोणत्याही महिला भगिनींनी योजनेच्या अर्जासाठी पैसे देऊ नये, गावातील अंगणवाडी सेविकेकडून अर्ज नि:शुल्क घ्यावा, असे आवाहन बिडीओ गोंगले यांनी केले.
राज्य सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ आपल्याला मिळावा यासाठी पात्र महिलांकडून सेतू केंद्र, ग्रामपंचायतींमध्ये एकच झुंबड केली जात आहे. याचा गैरफायदा घेत अर्जांची विक्री आणि आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी काही केंद्रांकडून पैसे घेण्याचा प्रयत्न झाला, पण प्रशासनाच्या तंबीनंतर हा प्रकार बंद झाला. वास्तविक कोणत्याही लाभार्थ्याकडून कोणतेही शुल्क घेऊ नये, असे सक्त निर्देश आहेत. त्यासाठी सर्व अंगणवाडी सेविकांकडे पुरेशा प्रमाणात अर्ज देण्यात आलेले आहेत. त्यामुळे ज्या महिलेला हे अर्ज पाहिजे असेल त्यांनी अंगणवाडी सेविकेकडून कोणतेही शुल्क न देता अर्ज घ्यावा, असे आवाहन बिडीओ गोंगले यांनी केले आहे.
परिसरातील 20 ते 25 गावांचे केंद्र असलेल्या पोटेगाव येथे योजनेच्या अर्जांच्या विक्रीची बातमी ‘कटाक्ष’मध्ये प्रकाशित होताच बिडीओ गोंगले यांनी तिकडे धाव घेऊन गावातील सरपंचासह इतर लोकांकडून शहानिशा केली. त्यांनी अर्ज भरण्याचे काम सुरळीत सुरू असल्याचे सांगितले.