आष्टी : येथील सावित्रीबाई फुले शाळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे आयोजन छत्रपती शिवस्वराज्य बहुउद्देशीय सेवा संस्था आष्टी व सेवार्थ फाऊंडेशन (एक हात मदतीचा) चंद्रपूर यांनी संयुक्तपणे केले होते. शिबिराच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते होते. तर शिबिराचे उद्घाटन आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या हस्ते झाले.

यावेळी मार्गदर्शन करताना डॅा.नेते म्हणाले, “आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. शरीर निरोगी असेल तरच मानसिकदृष्ट्याही निरोगीपणा लाभते. अस्वच्छतेमुळे रोगराई पसरते, त्यामुळे परिसर, घर आणि शरीर या तिन्ही ठिकाणी स्वच्छता आवश्यक आहे. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत हे आरोग्य शिबिर घेण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात राबविलेल्या ‘आयुष्यमान भारत योजना’ व ‘स्वच्छ भारत अभियान’ हे त्याचेच उदाहरण असल्याचे ते म्हणाले.
या शिबिरात विद्यार्थ्यांची उंची, वजन, डोळे, दात, रक्त तपासणीसह त्वचेवरील आजार, तोंडाच्या स्वच्छतेची माहिती, पोषक आहाराबाबत मार्गदर्शन, आरोग्य शिक्षण, खेळांचे महत्त्व, लैंगिक शिक्षण अशा विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. तसेच पालकांना मुलांच्या योग्य आहार व वाढीबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.
यावेळी प्रामुख्याने भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, ओबीसी मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, सरपंच बेबी बुरांडे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, मुख्याध्यापिका गलबले, ग्रामीण रूग्णालय आष्टीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.धाकडे, सामाजिक नेते संजय पंदिलवार, नरेश अल्सावार, शेषराव कोहळे, सुरेश गुंतीवार, आयोजक पवन रामगीरवार, संदीप तिवाडे, संदीप लोडेल्लीवार, देवा बोरकुटे आदींची उपस्थिती होती.
यावेळी गावातील नागरिकांनी पाणीपुरवठा व इतर स्थानिक समस्यांचे निवेदन माजी खासदार डॉ.अशोक नेते यांना दिले. त्यावर सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. गावातील नागरिक, पालक व शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदविला.

































