‘रेबिजमुक्त भारत’ अभियानाला सुरूवात, पाळीव प्राण्यांचे मोफत लसीकरण

शांतीग्राम मध्ये डॅा.अलोणे यांचा पुढाकार

मुलचेरा : तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 लगाम अंतर्गत येणाऱ्या शांतिग्राम येथे 28 सप्टेंबर रोजी ‘रेबिजमुक्त भारत’ अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले. दरवर्षी 28 सप्टेंबरला जागतिक रेबिज दिन साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून शांतिग्राम येथील प्राणीप्रेमी, श्वानप्रेमी तसेच प्रतिष्ठित गावकऱ्यांना रेबिज आजाराची लक्षणे, प्रादुर्भाव व त्यावरील उपाययोजना, प्रतिबंधात्मक लसीकरण याबाबत माहिती देण्यात आली. या अभियानात पाळीव प्राण्यांचे मोफत लसीकरण केले जात आहे.

सदर अभियानादरम्यान घरो-घरी जाऊन मोफत रेबिज प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. हे अभियान जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली पशुधन विकास अधिकारी डॉ.चेतन अलोणे यांनी राबविले.

याप्रसंगी गावच्या सरपंच अर्चना बैरागी आणि सदस्यगण, पशुसंवर्धन विभागाचे परमेश्वर राठोड आणि ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील अनेक श्वानप्रेमींनी सदर अभियानाचा लाभ घेत प्रतिबंधनात्मक लसीकरण करवून घेतले.