गडचिरोलीत 11.67 कोटीचे सुसज्ज कृषी भवन उभारणार

सहपालकमंत्र्यांचा पुढाकार

गडचिरोली : जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कार्यप्रणालीस आधुनिक आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन कृषी भवन उभारले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने त्यासाठी एकूण 11 कोटी 67 लाख 8 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे. कृषी राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री अॅड.आशिष जयस्वाल यांच्या पुढाकारातून यासंदर्भात शासन निर्णय 22 जुलै रोजी प्रसिद्ध झाला आहे.

नवीन कृषी भवनाचे बांधकाम गडचिरोली तालुक्यातील सोनापूर कॉम्प्लेक्स (फळरोपवाटिका प्रांगणात) करण्यात येणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, मृद चाचणी प्रयोगशाळा तसेच शेतकरी प्रशिक्षण केंद्र यासाठी स्वतंत्र सुसज्ज सुविधा या इमारतीत असणार आहेत.

बांधकामासाठी निधीचे वितरण

शासन निर्णयानुसार हे काम 2025-26 व 2026-27 या दोन आर्थिक वर्षांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. दोन्ही वर्षांत प्रत्येकी 5.84 कोटी रुपये एवढा निधी प्रस्तावित आहे.

कामाचा तपशील व खर्चाचा ताळेबंद

या इमारतीसाठी ग्राऊंड फ्लोअर, पहिला व दुसरा मजला अशा तीन मजल्यांचे बांधकाम होणार आहे. त्याशिवाय अंतर्गत पाणीपुरवठा, ड्रेनेज, वीजजोडणी, फर्निचर, अंतर्गत रस्ते आदी कामांचा समावेश आहे. यासाठी एकूण प्रकल्प खर्च 11.67 कोटी एवढा आहे.