गोल्डन कार्ड नोंदणी, वितरणात गडचिरोली जिल्हा राज्यात दुसरा

आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष गौरव !

गडचिरोली : आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड नोंदणीत गडचिरोली जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्यानिमित्त सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील एम्स रुग्णालयाच्या सभागृहात आयोजित महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियोजन

या महत्त्वपूर्ण यशामागे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे सक्रिय मार्गदर्शन आणि नियोजन महत्त्वाचे ठरले. त्यांनी दुर्गम भागांपर्यंत गोल्डन कार्ड पोहोचवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला प्रभावी दिशा दिली, ज्यामुळे हे अभियान यशस्वी झाले. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी या अभियानाच्या यशामध्ये मोठे योगदान दिले. त्यांनी तालुकास्तरावरील, तसेच ग्रामपातळीवरील नियोजन करून सर्व विभागांचा यामध्ये सहभाग घेतला आणि या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी टीमला प्रेरित केले.

यावेळी सीईओ गाडे म्हणाले, ‘अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुर्गम भागात परिश्रम घेतल्यामुळेच आम्ही आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड नोंदणीत राज्यात द्वितीय क्रमांक मिळवू शकलो. आमची टीम यापुढेही नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध असेल.’ त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

गडचिरोली टिमचा सत्कार

या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल, मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य टिमला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, जिल्हा समन्वयक डॉ.सुमेध चाटसे यांनी पुरस्कार स्वीकारला.

सर्व कर्मचाऱ्यांचे सामूहिक योगदान

मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात, सर्व गटविकास अधिकारी, समन्वयक, आशा, परिचारिका आणि आरोग्य सेवेतील इतर सर्व कर्मचाऱ्यांचे सामूहिक समर्पण या यशात अमूल्य ठरले आहे.

दुर्गम भागात सेवा देणाऱ्यांचा विशेष गौरव

यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य विभागात अतिदुर्गम भागात मुख्यालयी राहून उल्लेखनीय व उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. त्यात तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनीष धकाते, देलनवाडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय सुपारे, कोठी (ता.भामरागड)चे आरोग्य सेवक स्वप्निल येरमे, हालेवाराच्या आरोग्य सेविका करुणा सडमेक, कुवाकोडी ता.भामरागड)च्या आशा ललिता तिम्मा आदींचा समावेश होता.

या सत्कार कार्यक्रमाला आरोग्य सचिव डॉ.निपुण विनायक, ई.रवींद्रन, आरोग्य संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, डॉ.विजय कंदेवाड, उपसंचालक (नागपूर) डॉ.शशिकांत शंभरकर, राज्य क्षयरोग अधिकारी सांगळे, तसेच विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.