गडचिरोली : उच्च दर्जाच्या लोहखनिजासह इतरही खनिजांनी ओतप्रोत भरलेला ‘श्रीमंत’ जिल्हा अशी गडचिरोलीची छुपी ओळख आहे. मात्र गेल्या चार दशकांत प्रत्यक्षात हा जिल्हा गरीबच राहिला. या जिल्ह्याची श्रीमंती आता कुठे जगासमोर येत आहे. आज (26 ऑगस्टला) गडचिरोली जिल्हा निर्मितीला 43 वर्ष पूर्ण झाले. पुढील सात वर्षानंतर हा जिल्हा अर्धशतकी वाटचाल पूर्ण करेल, त्यावेळी या जिल्ह्याची ‘मागास जिल्हा’ ही ओळख पूर्णपणे मिटलेली असेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. (अधिक बातमी खाली वाचा)
26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातून वेगळा होऊन गडचिरोली या स्वतंत्र जिल्ह्याची निर्मिती झाली. 12 तालुक्यांच्या या जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र मोठे असले तरी 76 टक्के भूभाग जंगलाने व्यापलेला असल्यामुळे या जिल्ह्याच्या मानवी विकासाला बऱ्याच मर्यादा आल्या होत्या. त्यातच चार दशकांपूर्वी नक्षलवादाने (माओवाद) ग्रासल्यामुळे आणि त्याचा विस्तार जिल्हाभर झाल्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला मोठी खिळ बसली होती.
पण अलिकडे पोलिसांनी नक्षलवादाशी दोन हात करताना एकीकडे आक्रमक भूमिका, तर दुसरीकडे पीडित नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे करत त्यांच्या मुलभूत गरजा आणि विकासावर लक्ष केंद्रीत केले. त्यामुळे माओवाद्यांचे अस्तित्व पणाला लागले. आज बोटावर मोजण्याएवढे माओवादी या जिल्ह्यात सक्रिय आहेत. (अधिक बातमी खाली वाचा)
लॅायड्सची खाण आणि प्रकल्प ठरला ‘गेम चेंजर’
उच्च दर्जाच्या लोहखनिजांनी ओतप्रोत भरलेली सुरजागडच्या खाणीतून लोहखनिज काढणे सोपे काम नव्हते. सर्व प्रकारचा विरोध सकारात्मक वातावरणात बदलवत लॅायड्स मेटल्सने हे काम सुरू केले. चार वर्षांपूर्वी बी.प्रभाकरन यांनी लॅायड्सचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून जबाबदारी स्वीकारत या कामावर लक्ष केंद्रित केले. त्यांची ही एंट्री ‘गेम चेंबर’ ठरली. त्यांनी सुरजागड लोहखाणीसोबत कोनसरीतील लोहप्रकल्पाला गती देत झपाट्याने प्रकल्पाची उभारणी केली. (अधिक बातमी खाली वाचा)
आज कोनसरी परिसराचा झपाट्याने कायापालट होत असल्याचा अनुभव त्या भागातील गावकरी घेत आहेत. कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल अशी दर्जेदार शैक्षणिक सुविधा, आरोग्य व्यवस्था कोनसरी, सुरजागड भागातील नागरिकांना मिळत आहे. हजारो हातांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळत आहे. यासोबतच कोट्यवधी रुपयांचा महसूल जिल्हा खनिज निधीत जमा होत आहे. या निधीतून आता खाणबाधित क्षेत्रापासून 25 किमीच्या परिघातील गावांच्या सर्व समस्या दूर होतील. याशिवाय लॅायड्स मेटल्सच्या सामाजिक दायित्व निधीतून जिल्ह्याच्या इतर भागात विविध सोयी-सुविधा मिळू शकतील. (अधिक बातमी खाली वाचा)
महामार्गानंतर रेल्वेला गती, विमानतळही होणार
औद्योगिक विकासाच्या दृष्टिने अतिशय महत्वपूर्ण असणार्या दळणवळणाच्या सुविधांवर गेल्या 10 वर्षात भर देण्यात आला. तत्कालीन खासदार अशोक नेते यांच्या कार्यकाळात रेल्वेमार्गाच्या कामाचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली. याशिवाय जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुख्य मार्ग राष्ट्रीय महामार्गात परिवर्तित करून त्यांची नव्याने उभारणी झाली. वनविभागाच्या अडचणींमुळे काही टप्प्यांचे काम अडले असले तरी बहुतांश काम झाले आहे. आता विमानतळही मंजूर झाले. मेडिकल कॅालेजचीही भर पडली आहे. दक्षिण गडचिरोलीचे केंद्र असलेल्या अहेरीत महिला बाल रुग्णालयाची इमारत साकारली आहे. सुरजागड इस्पात कंपनीच्या माध्यमातून आणखी रोजगार निर्मितीचे नवीन दालन उघडले जात आहे. सकारात्मक वातावरण आणि पायाभूत सुविधांमुळे इतरही अनेक कंपन्यांना आता गडचिरोलीत गुंतवणूक करण्याचे वेध लागले आहे. (अधिक बातमी खाली वाचा)
जिल्ह्यातील जंगलाचे अस्तित्व कायम राहणार
आज लॅायड्स मेटल्सला अलिकडे लोहखाणीचे क्षेत्र वाढवून मिळाले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील जंगल नष्ट होईल अशी भीती अनेकांच्या मनात आहे. वास्तविक या लोहखाणीमुळे जिल्ह्यातील एक टक्कापेक्षाही कमी जंगल कापले जाईल. इतरही कंपन्यांनी लोहखाणींचे पट्टे घेतले तरीही गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लागणार नाही. विशेष म्हणजे लॅायड्स मेटल्सने यावर्षी त्यांच्या ‘ग्रिन गडचिरोली’ या उपक्रमात 10 लाख वृक्षांची लागवड केली आहे. याशिवाय मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट दिले आहे. ते दोन वर्षात पूर्ण केले जाणार आहे. यामुळे गडचिरोलीचे जंगल आणि हिरवेपण नष्ट होणार नाही, याची दक्षताही घेतली जात असल्याचे दिसून येते.