Home दैनंदिन बातम्या राज्यस्तरीय आंतरजिल्हा फुटबॅाल स्पर्धेत गडचिरोलीने मारली बाजी

राज्यस्तरीय आंतरजिल्हा फुटबॅाल स्पर्धेत गडचिरोलीने मारली बाजी

अमरावतीवर मात करत विजेतेपद

गडचिरोली : नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय आंतरजिल्हा गट अ फुटबॅाल सामन्यांमध्ये बुधवारी गडचिरोली आणि अमरावती संघांत अंतिम सामना रंगला. यात अमरावती संघावर मात करत गडचिरोलीचा संघ विजता ठरला.

वेस्टर्न इंडिया फुटबॅाल असोसिएशनद्वारे नांदेड येथे झालेल्या या सामन्यांमध्ये अ गटातील नंदूरबार, लातूर, बीड, नांदेड, गोंदिया, अमरावती, गडचिरोली आणि सोलापूर अशा आठ संघांनी सहभाग घेतला होता. गडचिरोली संघाने पहिल्या दिवशी नंदूरबार संघाचा 5-1 असे पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. दुसऱ्या दिवशी नांदेड संघाचा 2-0 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. तर अंतिम सामन्यात अमरावती संघावर मात करत विजेतेपद पटकावले.

गडचिरोली जिल्हा फुटबॅाल असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र दरेकर, सचिव सतीश पवार, तांत्रिक सल्लागार विजय सुपारे यांनी गडचिरोली संघाचे सर्व खेळाडू, प्रशिक्षक प्रशांत मलिक, व्यवस्थापक एम.एस. सरकार यांचे अभिनंदन केले. लॅायड्स मेटल्स कंपनीने गडचिरोली जिल्हा संघातील खेळाडूंना कोचिंग सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचेही आभार मानण्यात आले.