गडचिरोली : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ मिळण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातून आतापर्यत 1 लाख 55 हजार 712 महिलांनी अर्ज भरले आहेत. जिल्ह्यातील संभाव्य पात्र महिलांची संख्या सुमारे 2 लाख 58 हजाराच्या जवळपास आहे. त्या तुलनेत जिल्ह्यातील तब्बल 60 टक्के महिलांकडून अल्पावधीतच अर्ज भरून घेण्यात आल्याने गडचिरोली जिल्हा अर्ज भरण्याच्या टक्केवारीत राज्यात अग्रेसर आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांना या योजनेत सहभागी करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, नगर परिषद प्रशासनाचे उपायुक्त विवेक साळुंखे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रकाश भांदककर, महिला व बालविकासच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी अर्चना इंगोले, बालविकास प्रकल्प अधिकारी (शहरी) ज्योती कडू, तसेच जिल्हा प्रशासनाचे संबंधित अधिकारी जोमाने काम करीत आहेत.
या योजनेची नोंदणी अधिक गतिमान करण्यासाठी शासनाद्वारे नागरी व ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना अर्ज नोंदणीसाठी प्राधिकृत केले असून यासाठी त्यांना प्रोत्साहन भत्ताही देण्यात येत आहे. यासोबतच लाभार्थींना स्वत: नारीशक्ती दूत या ॲपवरही अर्जाची नोंदणी करण्याची सुविधा देण्या आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 55 हजार 712 अर्ज प्राप्त झाले आहेत. यात 8575 शहरी, तर एक लाख 47 हजार 137 अर्ज ग्रामीण भागातून आले आहेत. यात 41 हजार 92 अर्ज ऑनलाईन तर 1 लाख 14 हजार 620 अर्ज ऑफलाईन आहेत.
कोणत्या तालुक्यात किती अर्ज भरले
अहेरी- 7986, आरमोरी- 8761, भामरागड- 3768, चार्मोशी- 28937, देसाईगंज- 7715, धानोरा- 16581, एटापल्ली- 12839, गडचिरोली- 20047, कोरची- 7957, कुरखेडा- 10873, मुलचेरा- 10160, सिरोंचा- 11513 यासोबतच नगर परिषद / नगर पंचायतींच्या शहरी क्षेत्रात एकूण 8575 महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.