गडचिरोलीतील कामगिरीसाठी 17 पोलीस अधिकारी-अंमलदारांना ‘शौर्य पदक’

96 अंमलदारांना पदोन्नतीची भेट

गडचिरोली : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील पोलिस दलात आणि संरक्षण दलातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांना पदक जाहीर केले जातात. यावर्षी देशातील 208 जणांना राष्ट्रपतींनी पोलीस शौर्यपदक जाहीर केले. त्यात गडचिरोली पोलीस दलातील 17 अधिकारी आणि अंमलदारांचा समावेश आहे. गडचिरोलीत अपर पोलीस अधीक्षक म्हणून सेवा दिल्यानंतर सध्या वाशिम येथे पोलीस अधीक्षक असलेले अनुज तारे यांचाही त्यात समावेश आहे. याशिवाय गुणवत्तापूर्ण सेवेसाठी उपनिरीक्षक मधुकर पोचा नैताम यांना पदक जाहीर करण्यात आले.

26 जानेवारी 2024 रोजीच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 18 पोलीस अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपतींचे पोलीस शौर्य पदक व एका पोलीस अधिकाऱ्याला गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक प्राप्त झाले होते. त्यामुळे यावर्षी (सन 2024 मध्ये) एकुण 35 पोलीस अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपतींचे पोलीस शौर्य पदक व 2 अधिकारी, अंमलदारांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक प्राप्त झाले आहेत. मागील चार वर्षात (सन 2020 पासून) गडचिरोली पोलिस दलास 3 शौर्य चक्र, 203 पोलीस शौर्य पदक व 8 गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक प्राप्त झाले आहेत.

पोलीस शौर्यपदक प्राप्त अधिकारी व अंमलदारांमध्ये 1) अनुज मिलींद तारे (पोलीस अधीक्षक, वाशिम), 2) डॉ.कुणाल शंकर सोनवणे, (उपविभागीय पोलीस अधिकारी, चोपडा, जि.जळगाव) 3) राहुल नामदेवराम देव्हडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, 4) धनाजी तानाजी होनमाने (शहीद पोलीस उपनिरीक्षक), 5) दीपक रंभाजी औटे, पोलीस उपनिरीक्षक 6) विजय दादासो सपकाळ, पोलीस उपनिरीक्षक, 7) हवालदार महेश बोरु मिच्चा, 8) हवालदार कोतला बोटू कोरामी, 9) हवालदार नागेशकुमार बोंदयालु मादरबोईना, 10) हवालदार समय्या लिंगय्या आसम, 11) हवालदार महादेव विष्णु वानखेडे, 12) नायक विवेक मनकु नरोटे, 13) अंमलदार मोरेश्वर नामदेव पोटावी, 14) अंमलदार कोरके सन्नी वेलादी, 15) अंमलदार कैलास कुळमेथे, 16) अंमलदार शकील युसूफ शेख, 17) अंमलदार विश्वनाथ समय्या पेंदाम यांना पोलीस शौर्यपदक जाहीर झाले आहे.

सन 2017 मध्ये मौजा कापेवंचा-कवठाराम, तर सन 2019 मध्ये मोरमेट्टा व सन 2022 मध्ये कापेवंचा-नैनेर येथे झालेल्या पोलीस माओवादी चकमकीमध्ये एकुण 4 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश प्राप्त झाले होते. हे सर्व अधिकारी व अंमलदार त्यात सहभागी होते.

यासोबतच स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलीस दलात कार्यरत 41 पोलीस हवालदार यांना सहाय्यक फौजदारपदी, तर 55 पोलीस नाईक व अंमलदारांना पोलीस हवालदारपदी पदोन्नती मिळाली आहे. राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक प्राप्त व पदोन्नतीप्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी अभिनंदन करून पुढील सेवेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.