गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातून आता गांजाचीही तस्करी होऊ लागली आहे. मागील आठवड्यात धानोरा तालुक्यातून चंद्रपूरकडे जात असलेला गांजा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडल्यानंतर शनिवारी मुलचेरा व गोंडपिपरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत १२ किलो गांजासह बापलेकांना पकडले. विशेष म्हणजे हा गांजा कर्नाटक राज्यात नेला जात होता. आनंद सपन मंडल आणि अमुल्य आनंद मंडल अशी अटक केलेल्या बापलेकांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, या गांजा तस्करीची कुणकुण मुलचेरा पोलिसांना लागली होती. त्यानुसार त्यांनी मुलचेरा तालुक्यातील बंदुकपल्ली येथून गांजा घेऊन निघालेल्या आणि चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची वाट पाहात असलेल्या आनंद मंडल याच्याकडून ६ किलो ८०० ग्रॅम गांजा जप्त केला. आनंदचा मुलगा अमुल्य हा दुसऱ्या गाडीने चंद्रपूरकडे निघाला असल्याचे कळताच पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांनी गोंडपिपरी पोलिसांना माहिती दिली. त्यांनी नाकाबंदी करत अमुल्य यालाही ताब्यात घेऊन त्याच्याकडील जवळपास ५ किलो गांजा जप्त केला.
जप्त केलेला हा गांजा चंद्रपूर आणि तेथून रेल्वेने कर्नाटककडे नेला जाणार होता, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. परंतू गडचिरोली जिल्ह्यात गांजा कुठून येत आहे, याचा शोध लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.