
देसाईगंज : देसाईगंज नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन केंद्राला लागलेल्या भीषण आगीत या डेपोसह तेथील खत निर्मिती प्रकल्पाची यंत्र सामुग्री व साहित्याची हाणी झाली. तब्बल दोन दिवस ही आग धुमसत असताना आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर वायुप्रदुषण झाले असताना ही आग नेमकी कशी भडकली याच्या खोलात जाण्यात न.प.प्रशासन तयार नाही. त्याऐवजी नगर परिषद प्रशासनाने सारवासारवीची भूमिका घेतल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या आगीसाठी जबाबदार असणाऱ्यांना वाचविण्यासाठी नगर परिषद प्रशासनाचा खटाटोप सुरू असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, देसाईगंज नगर परिषदेच्या कचरा व्यवस्थापन केंद्रात गुरूवारी (दि.13) दुपारी आग भडकली. पाहता-पाहता आगीने रौद्र रूप घेत संपूर्ण कचरा डेपोला कवेत घेतले. भडकलेल्या आगीच्या ज्वाळा खत निर्मिती प्रकल्पाच्या साहित्यापर्यंत पोहोचल्या. तातडीने नगर परिषदेच्या अग्निशमन वाहनाने अनेक वेळा पाण्याचा मारा करत ही आग शुक्रवारी आटोक्यात आणली. पण अशा पद्धतीने अचानक आग भडकण्यासाठी कोण जबाबदार आहे याची कारणमिमांसा करण्याचे आणि जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे टाळून या गंभीर घटनेवर पांघरून घालण्याचा आटोकात प्रयत्न सुरू आहे.
राईस मिलमध्ये पेटविला होता कचरा?
नागरिकांच्या म्हणण्यांनुसार कचरा डेपोजवळच असलेल्या एका राईस मिलमध्ये कचरा पेटविण्यात आला होता. तो पेटलेला कचरा हवेत उडून कचरा डेपोमध्ये आला आणि त्यातून ही आग धुमसली अशी चर्चा सुरू आहे. कोणीतरी मुद्दाम ही आग भडकण्यासाठी तसे कृत्य केले असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र त्याच्या खोलात जाण्याचे टाळण्यासाठी या प्रकरणाची साधी तक्रारही पोलिसात करण्यात आली नाही.
मुख्याधिकारी म्हणतात, आम्ही आग विझवण्यातच व्यस्त
यासंदर्भात मुख्याधिकारी सतीश चौधरी यांना विचारले असता आम्ही कालपासून आग विझवण्यातच व्यस्त होतो, असे उत्तर त्यांनी दिले. ही आग मुद्दाम कोणी लावली असण्याची शक्यता दिसत नसल्याने पोलीस तक्रार केली नसल्याचे ते म्हणाले. पण एवढी मोठी आग भडकली कशी आणि ती कोणाच्या दुर्लक्षामुळे किंवा बेजबाबदारपणामुळे भडकली याची चौकशी होणे गरजेचे असताना त्याबाबत जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. वास्तविक कचऱ्याच्या आगीतून मोठ्या प्रमाणावर वायुप्रदुषण होत असल्याने हा गुन्हा आहे, असे प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेची तक्रार केल्यास या घटनेला जबाबदार कोण याचा तपास पोलीस करू शकतील. पण कोणाला वाचवण्यासाठी तर नगर परिषद प्रशासन या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष करत नाही ना, अशी चर्चा देसाईगंज शहरात सुरू आहे.
































