गडचिरोली : तेली समाज बांधव व आ.डॅा.देवराव होळी मित्र परिवाराच्या वतीने आयोजित तेली समाजाचा मेळावा गडचिरोलीतील सेलीब्रेशन हॅालमध्ये सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याला नागपूरवरून विशेष मार्गदर्शक म्हणून आलेले महाराष्ट्र प्रांतिक तेली महासंघाचे विदर्भ अध्यक्ष जगदीश वैद्य यांनी तेली समाजातील नेतृत्वाला विधान परिषदेवर प्रतिनिधीत्व देऊन तेली समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी राज्यकर्त्यांना केली. यावेळी डॅा.होळी यांनी विधानसभा क्षेत्रात झालेल्या कामांची माहिती देऊन तेली समाजाच्या विविध मागण्यांची पूर्तता करून निधीही उपलब्ध करून दिल्य्याचे सांगितले.
यावेळी मंचावर आ.डॅा.देवराव होळी, महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेचे विदर्भ अध्यक्ष जगदीश वैद्य, तेली महासभेचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष पुष्कर डांगरे, जागतिक तेली महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पिपरे, ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, पतसंस्थेचे अध्यक्ष भैय्याजी सोमनकर, नगर परिषदेच्या माजी अध्यक्ष योगिता पिपरे, तालुका भाजपाचे अध्यक्ष विलास भांडेकर, शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, युवा नेते मधुकर भांडेकर, प्रांतिक तेली महासभा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष लता कोलते, नगरसेविका वैष्णवी नैताम प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाबुराव कोहळे म्हणाले, आ.डॅा.होळी यांनी विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. तेली समाजासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला. त्यांनी नेहमीच ओबीसी हिताच्या दृष्टीने काम केले. येणाऱ्या काळात तेली समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या मेळाव्याच्या निमित्ताने तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी, नवनियुक्त अधिकारी व कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मोमेंटो व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.