जीडीसीसी बँक वैकुंठभाई मेहता पुरस्काराने मुंबईत सन्मानित

आज जिल्हा गौरव पुरस्कार वितरण

सहकार राज्यमंत्री डॅा.पंकज भोयर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना प्रंचित पोरेड्डीवार व इतर पदाधिकारी

गडचिरोली : दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन मुंबईतर्फे दरवर्षी रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या आर्थिक निकषानुसार उत्कृष्ट बँकांना दिल्या जाणाऱ्या कै.वेकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती बँक पुरस्कार यावर्षी सलग 13 व्या वेळी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला देण्यात आला. सन 2023-24 या वर्षाचा हा पुरस्कार मुंबईत राज्याचे सहकार राज्यमंत्री डॅा.पंकज भोयर यांच्या हस्ते बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी, मानद सचिव अनंत साळवे, संचालक डॅा.दुर्वेश भोयर तथा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी स्वीकारला.

देशातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सकारी बँका रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट 1949 अंतर्गत नियम व देखरेखीखाली कार्य करत असतात. त्यात सीआरएआर, एपीएचे प्रमाण, नफा आणि आर्थिक वर्षात होणारी व्यवसायवृद्धी आदी निकषांना पात्र असणाऱ्या जिल्हा बँकांना पुरस्कृत केले जाते.

गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँक 39 वर्षांपासून बँकेच्या 57 शाखांच्या माध्यमातून दुर्गम व अतिदुर्गम भागातील लोकांना बँकिंग सुविधा पुरवत आहे. याशिवाय मोबाईल बँकिंगपासून सर्व अत्याधुनिक सुविधा ग्राहकांना दिल्या जात आहे. विशेष म्हणजे इंटरनेट बँकिंगचा परवाना प्राप्त झालेली ही महाराष्ट्रातील पहिली आणि देशातील आठवी जिल्हा मध्यवर्ती बँक ठरली आहे.

चार दशकांत जुळले 4.30 लाख खातेदार

1985 मध्ये चंद्रपूर जिल्हा बँकेचे विभाजन होऊन दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना झाली. त्यावेळी बँकेच्या फक्त 14 शाखा कार्यरत होत्या. बँकेचा एकूण व्यवसाय 6 कोटी 60 लाखांचा होता. मात्र बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांची दूरदृष्टी आणि मार्गदर्शनाने या बँकेने जिल्हाभर आपल्या शाखांचे जाळे पसरवले. आजमितीस 57 शाखापर्यंत विस्तार झाला आहे. हेडरीसारख्या अतिदुर्गम भागातही या बँकेने ग्राहकांना एटीएम सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जिल्हाभर 39 एटीएमच्या माध्यमातून सेवा दिली जात आहे. आजच्या स्थितीत जिल्ह्यात 4 लाख 30 हजार खातेदारांनी या बँकेशी जुळून आपला विश्वास व्यक्त केला आहे.

आज स्मरणिकेचे प्रकाशन व जिल्हा गौरव पुरस्कार वितरण

माजी आमदार नामदेवराव पोरेड्डीवार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांनी स्वीकारलेले जनसेवेचे व्रत अविरत पुढे चालत राहावे या उद्देशाने ‘परंपरा लोकहिताची’ या पुस्तिकेचे प्रकाशन आज होणार आहे. याशिवाय जिल्हा बँकेतर्फे जिल्हा जाणारा 2024-25 चा जिल्हा गौरव पुरस्कार वितरण समारंभही होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयात दुपारी 12.30 वाजता होणाऱ्या या समारंभात दादाजी चुधरी यांना सन्मानित केले जाईल. याशिवाय वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे वाटप केले जाणार आहे.