राज्यस्तरीय उत्कृष्ट जिल्हा बँक पुरस्काराने जीडीसीसी सन्मानित

"नाबार्ड"कडून पुण्यात सत्कार

केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना बँकेचे सीईओ सतीश आयलवार

गडचिरोली : राष्ट्रीय कृषी आणि विकास बँकेच्या (नाबार्ड) 44 व्या स्थापना दिनानिमित्त राज्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँका व राज्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामकाजासाठी विविध पुस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यात गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेलाही (जीडीसीसी) सन्मानित करण्यात आले. (अधिक बातमी खाली वाचा)

जीडीसीसी बँकेने सन 2023-24 या आर्थिक वर्षात ठेवी, कर्ज, व्यावसायिक उलाढाल, वसुली, नफा, नेटवर्क, कर्जे, एनपीएचे प्रमाण या रिझर्व्ह बँक व नाबार्ड यांनी ठरवून दिलेल्या सर्व निकषांवर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय सहकार तथा नागरी उड्डान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी (यशदा) या ठिकाणी आयोजित या कार्यक्रमाला सहकार विभागाचे अतिरिक्त सचिव प्रविण दराडे, नाबार्ड मुख्य कार्यालय मुंबईचे उपकार्यकारी संचालक गोवर्धन रावत, सहकार आयुक्त दीपक तावेरे, नाबार्ड नाबार्डच्या महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालयाच्या मुख्य महाप्रबंधक रश्मी दराड आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

‘सहकार हाच ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आत्मा असून, 2047 मध्ये विकसित भारत करावयाचा असल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होण्याची गरज आहे. हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी सहकाराची आणि नाबार्डची भूमिका महत्वाची ठरणार आहे,’ असे प्रतिपादन यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मार्गदर्शन करताना केले.

गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यात 57 शाखांच्या माध्यमातून 254 सेवा / आविका सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिक कर्जवाटप करीत आहे. त्याचप्रमाणे बँकेने ग्राहकांना विविध अत्याधुनिक डिजीटल सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी, मानद सचिव अनंत साळवे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार. सर्व संचालक मंडळाने बँकेचे खातेदार, ग्राहक, सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि सभासद यांच्या सहकार्यासाठी त्यांचे आभार व्यक्त केले.